सध्या परतीचा पाऊस महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कोसळत असल्याने नदी आणि नाले तसेच ओढे बऱ्याच ठिकाणी दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे बऱ्याच ठिकाणी जीवित आणि वित्त हानीच्या देखील घटना घडताना आपल्याला दिसून येत आहेत. अशाच प्रकारची घटना राहुरी तालुक्यातील जांभळी येथील मुळा धरणाचा बॅकवॉटरमध्ये येणाऱ्या काळु नदीपात्रामध्ये घडली.
या नदीपात्रामध्ये अनिल चिमाजी आघान नावाच्या तरुणाचा काल बुधवारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वाचवण्याचे बरेच प्रयत्न मित्रांच्या माध्यमातून करण्यात आले परंतु त्यांना अपयश आले व शेवटी या तरुणाचा शोध घेण्यात यश आले व तरुणांनी मिळून त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला.
राहुरी तालुक्यात काळू नदीपात्रात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू
तालुक्यातील जांभळी येथील मुळा धरणाच्या बॅक वाटरमध्ये येणाऱ्या काळू नदी पात्रात एक २२ वर्षीय तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अनिल चिमाजी आघान असे नदीपात्रात बुडालेल्या तरुणाचे नाव असून काल बुधवारी या तरुणाचा शोध घेण्यात यश आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील जांभळी येथील बन्सीची वाडी येथे राहणारा अनिल आघान हा वनकुटे (ता. पारनेर) हद्दीतील काळुची वाडी येथे नातेवाईकांकडे गेला होता. मंगळवारी (दि. २४) दुपारी ३ वाजता अनिल आघान हा तरुण परत घरी येत असताना तो आंघोळ करण्यासाठी काळु नदी पात्रावरील पुलावर थांबला. नंतर त्याने पाण्यात उडी घेतली.
परंतू पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो गटांगळ्या खात वाहून गेला. त्यानंतर तरुणांनी आरडोओरडा करीत पाणबुड्यांना बोलविण्याचा प्रयत्न केला. अनिल आघान याचे मित्र सुनिल आघान, सुभाष केदार संदिप भले यांनी पाण्यात उडी घेत अनिल आघान याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले आणि अनिल आघान हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. वावरथचे माजी सरपंच ज्ञानेश्वर बाचकर, जांभळीचे सरपंच शौकत शेख यांनी प्रशासनाला माहिती देत मदतीचे आवाहन केले. घटनास्थळी सागर बाचकर, किरण जाधव यांच्यासह वावरथ, जांभळी परिसरातील तरुण मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत तरुणाचे शोधकार्य सुरूच होते.
अखेर घटनेच्या २४ तासानंतर काल बुधवारी (दि.२५) दुपारी ३ वाजेच्या दरम्यान, पाण्यात वाहून गेलेला अनिल आघान या तरुणाचा शोध घेण्यास यश आले. परिसरातील तरुणांनी अनिल आघान याचा मृतदेह पाण्यात बाहेर काढला. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.