‘आधी गणेश कारखाना, नंतर मुलाचा पराभव म्हणून ते घाबरलेत, आता विखेंना निवडणुकीत फक्त पराभव दिसतोय……’ ; माजी आमदार मुरकुटेंचा जोरदार हल्ला

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 66 व्या सर्वसाधारण सभेचे नुकतेच आयोजन झाले होते. या कार्यक्रमात मुरकुटे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना मुरकुटे यांनी विखे यांना आता निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे, त्यामुळे त्यांनी उसाच्या दरवाढीची घोषणा केली असल्याचे म्हटले आहे.

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसांनी राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचा थरार रंगणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. इच्छुक नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

अशातच श्रीरामपूर मधील अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर मोठे आरोप करत त्यांना निवडणुकीत फक्त पराभव दिसतोय असं म्हणत त्यांना डिवचलं आहे.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 66 व्या सर्वसाधारण सभेचे नुकतेच आयोजन झाले होते. या कार्यक्रमात मुरकुटे हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना मुरकुटे यांनी विखे यांना आता निवडणुकीत पराभव दिसू लागला आहे, त्यामुळे त्यांनी उसाच्या दरवाढीची घोषणा केली असल्याचे म्हटले आहे.

पुढे बोलताना मुरकुटे यांनी जिल्हा बँकेकडून बेकायदा कर्ज घ्यायचे, सत्ता असल्यामुळे कर्ज घ्यायचे आणि ते पुन्हा निवडून येण्यासाठी उधळायचे असा आरोप करत त्यांनी विखे यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जिल्हा बँकेच्या कामकाजावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

आधी गणेश कारखान्यात पराभव झाला, लोकसभेत मुलाचा पराभव झाला यामुळे विखे घाबरले आहेत आणि म्हणूनच प्रवरा साखर कारखान्याची ऐपत नसताना सभासदांना तीन हजाराचा दर देण्यात आला असून आता परत दोनशे रुपये दिले जाणार आहेत, असं म्हणतं विखें यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

यावेळी मुरकुटे यांनी एका वर्षात प्रवरा साखर कारखान्याला 200 कोटी रुपयांचा नफा कसा झाला? ते महसूल मंत्री आहेत ते काहीही करू शकतात त्यांचा काटा तपासायला कोण जाणार? असे म्हणतं प्रवरा साखर कारखान्यांवरही मोठे भाष्य केले.

तसेच त्यांनी प्रवरा साखर कारखान्याने जिल्हा बँकेकडून 70 कोटींचे कर्ज घेतले असून यातूनच ही पतपैशाची उधळपट्टी सुरू आहे असा मोठा गंभीर आरोपही केला आहे. संजीवनी कोळपेवाडी आणि प्रवरा हे दारू तयार करणारे कारखाने आहेत. यामुळे प्रवरा कारखाना आदर्श कारखाना नाही.

या कारखान्यांमध्ये साखरेच्या उत्पादनात नुकसान आहे मात्र दारू मधून जास्त पैसे मिळत असल्याने ते कधीही ज्यादा भाव देऊ शकतात असे मुरकुटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या माजी आमदार आणि अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मुरकुटे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe