‘कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मुख्यमंत्री झालेत आणि त्यांनी…..’ शरद पवार यांच्या पाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान

Rohit Pawar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी आता शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली असून या दोन्ही गटांमध्ये जागावाटप देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आत्तापासूनच रंगीत तालीम सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या राज्याचे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब गेल्या काही दिवसांपासून आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरे करत आहेत.

पक्षाच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रा सुद्धा काढण्यात आली आहे. दरम्यान शरद पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये नुकतेच एक मोठे विधान केले होते. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकतात असे संकेत दिलेत.

शरद पवार यांनी कर्जत जामखेड मध्ये बोलताना रोहितने कधीही पदाची अपेक्षा केलेली नाही. त्याने निवडून आल्यानंतर पहिली पाच वर्ष त्याच्या मतदारसंघातील जनतेची सेवा केली आहे. एवढेच नाही तर शरद पवार यांनी रोहितची पहिली पाच वर्ष तुमची सेवा करण्यासाठी आणि पुढील पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असतील असेही म्हटलं होतं.

यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर रोहित पवार हे या सत्तेचा एक महत्त्वाचा भाग असतील हे या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. रोहित पवार मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात अशा चर्चांना देखील गेल्या काही दिवसांपासून ऊत आले आहे.

अशातच आता शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार रत्न सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. शरद पवार यांनी रोहित पवारांबाबत जे विधान केले होते त्या संदर्भात सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारणा केली.

यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी ‘रोहित पवार जर मुख्यमंत्री झालेत किंवा शरद पवारांचा वारसा त्यांनी चालवला तर माझी हरकत असण्याचं कारणच काय ? रोहितच का ? माझ्या वडिलांचा वारसा कुणीही चालवू शकतं, असं म्हणतं सुप्रिया सुळेंनी रोहित पवार हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिले आहेत.