Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विशेषता महिलांसाठी काही कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही देखील अशीच एक योजना आहे. या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
म्हणजेच एका वर्षात पात्र महिलेला 18 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात होते आणि 30 सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची दिनांक होती. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत.
ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज केले होते त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे 4500 रुपये आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेत त्यांना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये देण्यात आले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी आज बीड येथील एका सभेत लाडक्या बहिणींना आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आणखी तीन हजार रुपये दिले जाणार अशी घोषणा केली आहे.
म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना दिवाळीच्या आधीच आणखी तीन हजार रुपयांची मोठी भेट मिळणार आहे. दिवाळीच्या आधी भाऊबीज म्हणून हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करू अशी घोषणा करत हा अजित दादाचा वादा असल्याचे उपमुख्यमंत्री महोदयांनी यावेळी म्हटले आहे.
त्यामुळे लाडकी बहिण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र या योजनेसाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत. दरम्यान आता आपण याच नियमांची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लाडकी बहीण योजनेचे नियम खालील प्रमाणे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या महिलांना मिळणार आहे. तथापि, ज्या महिलांचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले आहे अशा महिला देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
याचा लाभ 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दिला जाणार आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरतो म्हणजेच आयकरदाता आहे त्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
ज्या कुटुंबातील कोणताही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात नियमित, कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्त आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही. महिला स्वत: किंवा तिच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही योजनेतून दरमहा 1,250 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम घेत आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणताही सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही मंडळ, महामंडळ किंवा उपक्रमाची अध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहे अशांना याचा लाभ मिळणार नाही. ज्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून इतर चार चाकी वाहन असेल अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार नाही.