Pune To Mumbai New Expressway : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे भविष्यात या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे.
मुंबई ते पुणे हा प्रवास भविष्यात फक्त दीड तासात पूर्ण करता येणे शक्य होणार असून यासाठी एक नवीन एक्सप्रेस वे तयार केला जाणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही घोषणा केली आहे.

सध्या पुण्याहून मुंबईला जायचे म्हटले की दोन ते तीन तास सहज लागतात. ट्रॅफिक जर जास्त राहिले तर यापेक्षाही अधिकचा वेळ लागतो. मात्र आता ही समस्या कायमची दूर होणार आहे. लवकरच एका नव्या एक्सप्रेस वे चे काम सुरू होणार आहे.
गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते बेंगलोर दरम्यान आता एक नवीन मार्ग तयार होणार आहे. या नवीन एक्सप्रेस वे प्रोजेक्ट अंतर्गत मुंबई येथील अटल सेतूच्या पुढे मुंबई ते पुणे या द्रुतगती महामार्गाला समांतर असा नवा मार्ग बांधला जाणार आहे.
हा मार्ग पुणे, सातारा, सांगळी, बेळगाव असा बेंगलोर पर्यंत जाणार आहे. या महामार्गापैकी 307 किलोमीटरचं अंतर आपल्या राज्यात राहील आणि उर्वरित 493 किलोमीटरचं अंतर कर्नाटकात राहणार आहे. हा महामार्ग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून पुण्याला दीड तासात पोहोचता येईल अन तिथून पुढे बंगळुरूला साडेचार ते पाच तासात पोहोचता येणे शक्य होणार असल्याचा दावा केला जात आहे.
यासाठी तब्बल 60,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली आहे. अर्थातच राज्याला लवकरच एका नवीन महामार्गाची भेट मिळणार आहे. गडकरी यांनी म्हटल्याप्रमाणे, या महामार्गाचे दहा हजार कोटी रुपयांचे पहिले काम येत्या महिन्याभरात सुरू होणार आहे आणि उर्वरित 50 हजार कोटी रुपयांचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण होणार आहे.
यामुळे मुंबई, पुण्याहून बेंगलोरला जाणे सोयीचे होणार आहे तसेच मुंबई ते पुणे हा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. खरे तर मुंबई ते पुणे दरम्यान दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. परंतु, सध्या या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करायचा असेल तर दोन ते तीन तासांचा वेळ खर्च करावा लागतोय.
त्यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ तर वाया जातच आहे शिवाय प्रवाशांना अधिकचा इंधन खर्च देखील करावा लागतोय. मात्र जेव्हा मुंबई बेंगलोर नवीन महामार्ग तयार होईल तेव्हा प्रवासाचा कालावधी निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई ते पुणे हा प्रवास फक्त 90 मिनिटात म्हणजे दीड तासात पूर्ण होईल असा दावा सरकारकडून केला जात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महामार्गाचे काम येत्या महिन्याभरात सुरू होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.