Mumbai New Expressway : मुंबई शहरातील नागरिकांसाठी लोकल ही लाईफ लाईन आहे. लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते खरे मात्र हा प्रवास फारच जीवघेणा आणि रिस्की आहे. लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
जर तुम्हाला विक्टोरिया रेल्वे स्थानक म्हणजेच सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून जर ठाण्याला जायचे असेल तर लोकलचा पर्याय सर्वात बेस्ट ठरतो. मात्र लोकलच्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

म्हणून सीएसएमटी ते ठाणे हा लोकल प्रवास नकोसा वाटतो. मात्र भविष्यात सीएसएमटी ते ठाणे हा प्रवास सोयीचा होणार आहे. लोकल प्रमाणेच सीएसएमटी ते ठाणे हा बाय रोड प्रवास देखील जलद होईल अशी शक्यता बळावली आहे.
कारण की मुंबईमधील एका महत्त्वाच्या मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. आता ईस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पाचे भूमिपूजन सुद्धा नुकतेच संपन्न झाले आहे. या प्रकल्पांतर्गत घाटकोपरच्या छेडानगर ते ठाणे दरम्यान उन्नत रस्ता तयार करण्यात येणार आहे.
छेडा नगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे दरम्यान हा उन्नत पूर्व मुक्त विस्तार मार्ग विकसित केला जाणार आहे. या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे.
मुंबई आणि ठाणे शहराला जोडणारा 13.40 किमी लांबीचा हा सहा पदरी कॉरिडोर संपूर्ण उन्नत कॉरिडॉर राहणार आहे. या कॉरिडॉरच्या माध्यामातुन मुंबई आणि ठाणे एकमेकांशी जोडले जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळणार आहे.
दक्षिण मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई दरम्यानची वाहतूक या प्रकल्पामुळे सुरळीत होणार आहे. सध्याचा ईस्टर्न फ्री वे सीएसएमटी जवळून सुरू होतो आणि मानखुर्द जवळ संपतो. या फ्री वे ने सीएसएमटी ते मानखुर्द हा प्रवास वीस मिनिटात पूर्ण होतो.
आता या मार्गाचा विस्तार ठाण्यापर्यंत होणार असून छडा नगर ते ठाणे या दरम्यान तयार होणाऱ्या उन्नत रस्त्यामुळे मानखुर्द पासून ते ठाण्यापर्यंतचा प्रवास अवघ्या वीस मिनिटात पूर्ण होणार आहे म्हणजेच मुंबई ते ठाणे हा प्रवास फक्त 40 मिनिटात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.