Bhanudas Murkute : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. यामुळे पोलीस प्रशासनावर आणि शासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दिवसेंदिवस महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.
अशातच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात एका शेतात काम करणाऱ्या महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण सध्या नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी अर्थातच 7 ऑक्टोबरला राहुरी तालुक्यातील एका महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. मात्र काल मुरकुटे हे कामानिमित्त मुंबईला गेले होते.
यामुळे त्यांना काल मध्यरात्री एक वाजून 35 मिनिटांनी पोलिसांनी अटक केली. दरम्यान आज आपण सदर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नेमके काय म्हटले आहे ? यासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
माजी आमदार मुरकुटे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय ?
महिलेने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, सदर महिला ही मुरकुटे यांच्या शेतात कामाला होती. दरम्यान, या महिलेवर सर्वप्रथम 2019 मध्ये अत्याचार झाला. त्यावेळी मुरकुटे यांनी गुंगेच्या औषध देऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
त्यानंतर मग मुरकुटे यांनी घर, शेतजमीन घेऊन देतो, मुलाला नोकरीला लावून देतो अशी आमिषे दाखवून 2023 पर्यंत वेळोवेळी अत्याचार केला. सदर फिर्यादीत सांगितल्याप्रमाणे, पीडित महिलेवर तिच्यावर नगर जिल्हा, मुंबई आणि दिल्ली सारख्या ठिकाणी अत्याचार झाला आहे.
माजी आमदारांची पोलीस कोठडीत रवानगी
मुरकुटे यांच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसी फौज फाटा मुरकुटे यांच्या निवासस्थानी दाखल झाला आणि त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान काल सकाळी मुरकुटे यांचे वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
राहुरी न्यायालयात मुरकुटे यांना दुपारी साडेतीन वाजता हजर करण्यात आले. न्यायालयात जवळपास रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात जोरदार युक्तीवाद झाला. नंतर रात्री दहा वाजता राहुरी न्यायालयाने मुरकुटे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.