Mahavikas Aaghadi Sarkar : भारतीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असे बोलले जात आहे. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्राची विधानसभा विसर्जित होणार आहे आणि त्याआधी नवीन सरकार स्थापित होणे आवश्यक आहे. यामुळे लवकरच निवडणुकांची घोषणा होईल आणि दिवाळीनंतर निवडणुका होतील असा दावा केला जात आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार असे विधान केले आहे. दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे.
राजकीय पक्षांच्या नेत्यांचे अन इच्छुक उमेदवारांचे त्यांच्या मतदारसंघांमधील दौरे वाढले आहेत. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. मात्र लवकरच दोन्ही गटांकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल असे बोलले जात आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या तिन्ही घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण होतांना दिसत आहे.
आघाडीचा सीएम पदाचा चेहरा कोण याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहेत. आघाडी मधील नेत्यांचे सीएम पदासंदर्भात वेगवेगळे विधाने सुद्धा समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी आघाडीमध्ये समावेश असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले होते.
हाय कमांडचा आदेश आला तर मी मुख्यमंत्री होणारच असे विधान त्यांनी केले होते. मात्र हे विधान त्यांनी प्रफुल पटेल यांच्या टीकेला उत्तर देताना केले होते. तथापि पटोले यांच्या या विधानानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्यावरून बिघाडी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.
दरम्यान आता पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल मोठे विधान केले आहे. नाना पटोले यांनी, ‘आम्ही एक आहोत, मुख्यमंत्री एकमताने ठरवू. हे जाहीरपणे सांगतो. महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र धोक्यात आहे.
मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. खोकेवाल्यांसाठी आहे’, असे म्हणतं निवडणूक झाल्यानंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री जाहीर होईल असे स्पष्ट केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी नाना पटोले, शरद पवार, उद्धव ठाकरे यांसह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी हे विधान केले आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांनी महायुतीने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर लगेचच महाविकास आघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार असे म्हटले आहे.