Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय रेल्वेने चांगली नेत्र दीपक प्रगती केली आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर रेल्वेचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झाली आहे. सर्वप्रथम ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती.
यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. सध्या ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर धावत आहे. आपल्या महाराष्ट्राला देखील आत्तापर्यंत 11 नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राला आणखी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहेत.
सध्या राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
भविष्यात महाराष्ट्राला आणखी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत. त्यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 11 वरून 17 वर जाणार आहे. दरम्यान, आता आपण महाराष्ट्रातील कोणत्या सहा मार्गांवर ही गाडी सुरू होणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील कोणत्या मार्गांवर ही गाडी सुरू होणार
मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, मुंबई ते कोल्हापूर या मार्गांवर आगामी काळात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
तथापि या संदर्भात अजून अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु देशातील प्रमुख शहरादरम्यान ही गाडी सुरू करण्यासाठी रेल्वे आग्रही असल्याचे दिसते. यामुळे आगामी काळात महाराष्ट्राला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कोल्हापूरला वंदे भारतची भेट मिळणार असे म्हटले होते. यानुसार पुणे ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे. परंतु प्रत्यक्षात ही गाडी मुंबई ते कोल्हापूर अशी चालवली जाणार होती.
त्यामुळे भविष्यात पुणे ते कोल्हापूर यादरम्यान सुरू असणारी ट्रेन मुंबई ते कोल्हापूर अशी चालवली जाईल अशी शक्यता बळावत आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी विस्तारणार आहे.