Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडे जाहीर केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. अर्थातच एका पात्र महिलेला एका वर्षात अठरा हजार रुपये मिळणार आहेत. ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे.
यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्यात आले आहेत. पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे देण्यात आले आहेत. ज्या महिलांना या योजनेचा जुलै महिन्यापासून लाभ मिळतोय त्या महिलांना या अंतर्गत आतापर्यंत 7500 देण्यात आले आहेत.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे नुकत्याच काही दिवसांपूर्वी एकत्रितच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एकाच वेळी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
खरं तर लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे महायुती सरकारला मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे. या योजनेमुळे जुलै च्या आधी बॅक फुटवर असणारे महायुती सरकार आता फ्रंट फूट वर आले आहे.
दरम्यान, या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार हा मोठा सवाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील हप्त्याचे वाटप होणार आहे.
तोपर्यंत लाभार्थी महिलांना वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. कारण की सध्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता आहे. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान होणार आहे आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
त्यानंतर मग राज्यात नवीन सरकार येईल आणि नवीन सरकार आल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत आता लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना वाट पहावी लागणार आहे.