7th Pay Commission : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात आठवा वेतन आयोगाच्या चर्चा रंगल्या आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केली जात आहे. खरे तर वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू झाला आहे.
सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. अर्थातच आता आठवा वेतन आयोग हा 2026 मध्ये लागू होणे अपेक्षित आहे. त्याआधी आठवा वेतन आयोगासाठीच्या समितीची स्थापना होणे अपेक्षित आहे.

मात्र, केंद्रातील मोदी सरकारकडून अजून आठवा वेतन आयोगासंदर्भात कोणताच प्रस्ताव शासन दरबारी विचाराधीन नसल्याचे अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच, अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा गेल्या आठ वर्षांपासूनचा वेतन आयोगाचा प्रश्न आता निकाली निघाला आहे.
खरे तर, महापालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न तब्बल आठ वर्षांपासून प्रलंबित असून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम भैया जगताप आणि महापालिका आयुक्त यशवंतराव डांगे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते.
आता आमदार जगताप आणि डांगे यांच्या प्रयत्नांना यश आले असून महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग अंतर्गत लाभ दिला जात होता.
मात्र यापुढे या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगा अंतर्गत आर्थिक लाभ मिळणार आहे. त्या संबंधित महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली असून महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून संबंधित मनपा कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी देखील सुरू झाली आहे.
यामुळे आता मनपा कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार हा सातवा वेतन आयोगानुसार मिळणार आहे. यामुळे या संबंधित नोकरदार मंडळीची दिवाळी मोठ्या आनंदात साजरा होईल अशी आशा आहे.
अहिल्यानगर महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या आणि महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून सध्या या सदर नोकरदार मंडळींमध्ये खूपच आनंदाचे वातावरण आहे.
खरे तर हा निर्णय याआधीच होणे अपेक्षित होते. मात्र, उशिरा का होईना पण आता सातवा वेतन आयोगाबाबत चा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगासहित पगार जमा केल्याबद्दल मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने आयुक्त यशवंत डांगे यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांना लवकरच दिवाळी सणाच्या निमित्ताने दिले जाणारे सानुग्रह अनुदान देखील मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. नक्कीच हे अनुदान दिवाळीच्या आधीच सदर नोकरदार मंडळीच्या खात्यात जमा झाले तर महापालिका कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा मिळणार आहे.