Maharashtra Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने आज मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, नाशिक जिल्ह्याचा घाटमाथा परिसर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी झाला आहे.
तसेच आज कोकणातील सर्व जिल्ह्यांना म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
त्यामुळे या सदरील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. असे असतानाच महाराष्ट्राला लवकरच चक्रीवादळाचा देखील फटका बसणार असल्याचा अंदाज समोर येत आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचे बोलले जात आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात दाना नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्राला सुद्धा फटका बसणार आहे.
सध्या महाराष्ट्रात मान्सूनोत्तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज तर काही भागांमध्ये गारपीट देखील होईल असा अंदाज आहे. दुसरीकडे महाराष्ट्राला लवकरच दाना चक्रीवादळाचा फटका बसणार असून यामुळे राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडेल आणि पूरस्थिती तयार होण्याची भीती आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या नव्या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून ते दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ येत्या काही तासात तीव्र होईल आणि 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान पूर्वेकडील समुद्रकिनाऱयावर आदळण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाचा फटका फक्त आपल्या महाराष्ट्राला अन भारतालाच बसणार असे नाही तर याचा परिणाम हा बांगलादेश आणि म्यानमारवरही होण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ अन मराठवाडा या भागात अतिवृष्टी सारख्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळामुळे पुढील दोन दिवस तामीळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा धोका आहे.
त्यामुळे महाराष्ट्रासहित या सदरील राज्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे. या पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी देखील या काळात सावधगिरी बाळगावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे.