7th Pay Commission : केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53% केला आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढ लवकरात लवकर लागू झाली पाहिजे अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केले जात आहे.
मात्र सध्या महाराष्ट्रात आचारसंहिता सुरू आहे आणि यामुळे राज्य सरकार याबाबतचा निर्णय सध्या घेणार नसल्याचे दिसते. कर्मचारी संघटनांनी मात्र महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यासाठी आचारसंहितेचा कोणताच अडसर येत नसल्याचे म्हटले आहे.

पण, अजूनपर्यंत याबाबतचा निर्णय झाला नसल्याने महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना नवीन सरकार स्थापित झाल्यानंतरच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असे दिसते.
दुसरीकडे मध्य प्रदेश राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
आधी मध्य प्रदेश राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता आता मात्र त्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.
१ जानेवारी २०२४ पासून सरकारी कर्मचाऱ्यांना ५०% दराने महागाई भत्ता दिला जाईल आणि महागाई भत्ता थकबाकीची रक्कम याच आर्थिक वर्षात चार समान हप्त्यांमध्ये दिली जाणार अशी माहिती मध्य प्रदेश राज्य सरकारने दिली आहे.
यामुळे मध्य प्रदेश राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असे बोलले जात आहे. नक्कीच या निर्णयाचा मध्य प्रदेश राज्यातील हजारो राज्य कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
ऐन दिवाळीच्या आधीच मध्यप्रदेश राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याने यामुळे तेथील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होईल अशी आशा आहे.