Rahuri Politics News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या 12 विधानसभा मतदारसंघ असणारा अहिल्यानगर जिल्हा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. गत काही दिवसांमध्ये जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. खरंतर महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्षांच्या फुटी नंतर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.
नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्ष फुटीचा थोडाफार प्रभाव पाहायला मिळाला. फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य जनतेने नाकारले असल्याचे लोकसभा निवडणुकीत निदर्शनास आले. फोडाफोडीच्या राजकारणापायी महायुती सरकारमधील अनेक दिग्गज नेते पराभूत झालेत.

म्हणून आता विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दन काय कौल देणार? पाच वर्षांनी होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुती कोणाचे सरकार राज्यात येणार या साऱ्या गोष्टी विशेष पाहण्यासारख्या ठरणार आहेत. दरम्यान या लक्षवेधी निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
दोन्ही गटांमधील फायर ब्रँड नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मेहनत घेत आहेत. जनतेच्या दरबारात आता नेते आपल्या पाच वर्षांच्या विकास कामांची माहिती घेऊन जात आहेत तसेच पुढील पाच वर्षात कोण कोणती विकास कामे केली जातील याचा रोड मॅप आता नेत्यांच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात मांडला जात आहे.
अशातच राहुरी विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी हाती आली आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात चर्चेतला मतदारसंघ. या मतदारसंघात महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.
दुसरीकडे महायुतीकडून या जागेवर शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. यामुळे यंदाही राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक विशेष हाय प्रोफाईल बनली आहे. राहुरी मतदार संघात सध्या स्थितीला महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने जो कौल दिला आहे त्यामुळे तनपुरे यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना तनपुरे यांनी मतदार संघात जी कामे केलीत, जो कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघासाठी खेचून आणला, या कामाच्या आणि विकासाच्या जोरावर ते पुन्हा एकदा मतदारांमध्ये जात आहेत.
त्यांना मतदारसंघातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी साऱ्यांकडूनच जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. दरम्यान, विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत गुहा विकास सोसायटीचे मा.चेअरमन शरदराव गोरक्षनाथ कोळसे पा. यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) अधिकृत रित्या प्रवेश घेतला आहे.
राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या उपस्थितीत कोळसे पाटील यांनी हाती तुतारी घेतली आहे. कोळसे पाटील यांनी निवडणुकांच्या हंगामात हाती तुतारी घेतली असल्याने याचा फायदा आमदार प्राजक्त तनपुरे यांना या निवडणुकीत होईल असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.
दरम्यान या पक्षप्रवेशाचा भारतीय जनता पक्षाचे अर्थातच महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गुहामध्ये कोळसे पाटील यांचा मोठा जनसंपर्क असल्याचे म्हटले जाते.
कोळसे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या काळात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या खेम्यात येण्याचा निर्णय घेतला असल्याने याचा फायदा विद्यमान आमदारांना होणार यात शँकाचं नाही. या पक्षप्रवेशाचा गुहामध्ये शिवाजीराव कर्डिले यांना मोठा राजकीय धक्का बसलाय अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असून शिवाजीराव कर्डिले आणि भारतीय जनता पक्षाच्या खेम्यात अस्वस्थता पसरलेली आहे.