Havaman Andaj 2024 : महाराष्ट्रात पावसाळी वातावरणामुळे यंदा थंडीला उशिराने सुरुवात झाली. पण आता दिवाळीनंतर राज्यातील बहुतांशी भागांमध्ये थंडी पडायला सुरुवात झाली आहे. खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये सकाळी सकाळी बोचरी थंडीचा अनुभव येतोय. अशातच आता राज्याच्या हवामानाचे तालरंग बदलणार असे बोलले जात आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 14 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. 14 नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि 15 नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.

या भागात पावसाची शक्यता असल्याने येथील थंडीची तीव्रता थोडीफार कमी होण्याची शक्यता देखील आहे. किमान तापमान वाढेल आणि यामुळे थंडीची तीव्रता कमी होईल असे मत काही जाणकारांनी यावेळी व्यक्त केले आहे.
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापुर, तर शुक्रवारी (ता. १५) पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापुर आणि कोकणातील दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असे म्हटले आहे.
हे दोन दिवस यासंबंधी जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे सुद्धा वाहतील असेही हवामान खात्याने यावेळी स्पष्ट केले असून वादळी पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जाणकारांनी केले आहे.
दरम्यान पावसाची शक्यता लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील या संबंधीत जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरंतर दिवाळीच्या काळात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली.
त्यामुळे खरिपातील तूर, कापूस, सोयाबीन सारख्या पिकांना मोठा फटका बसला. अगदीच हातात तोंडाशी आलेला घास यामुळे हिरावून घेतला जाईल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली होती. महत्त्वाचे म्हणजे काय ठिकाणी दिवाळीच्या काळात झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.
ज्या भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते तेथील शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झालीत. दिवाळीच्या काळात राज्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सारखा पाऊस झाला होता आणि यामुळे तेथील शेतकऱ्यांचे पिके भुईसपाट झाली असून त्यांना हजारो रुपयांचा फटका बसलाय.
त्यामुळे सदरील शेतकऱ्यांच्या माध्यमातून तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मंजूर केली जावी अशी मागणी यावेळी उपस्थित केली जात आहे. दरम्यान अशी सारी परिस्थिती असतानाच आता महाराष्ट्रात 14 आणि 15 नोव्हेंबरला पुन्हा एकदा पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याकडून जारी करण्यात आला असल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत.