Nashik Pune Railway News : नाशिक, पुणे अन मुंबई ही राज्यातील तीन महत्वाची शहरे. या शहरांना राज्याचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळख प्राप्त आहे. पण याच सुवर्ण त्रिकोणातील नाशिक आणि पुणे या दोन शहरादरम्यान अजूनही रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही.
काही महिन्यांपूर्वी पुणे-अहिल्यानगर-नाशिक दरम्यान नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. परंतु हा प्रकल्प मंजुरी अभावी अडकून पडलाय. 232 किलोमीटर लांबीच्या या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळत नसल्याने अजूनही हा प्रकल्प फाईल बंद आहे.
मात्र आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापित झाले असल्याने या रखडलेल्या प्रकल्पाला पुन्हा एकदा बळ मिळेल आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये महायुती सरकारला घवघवीत यश मिळाले आहे. महायुती मधील भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट आणि शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीत 232 जागा मिळाल्या असून येत्या दोन-तीन दिवसात नवीन सरकार सत्ता स्थापित करणार आहे.
दरम्यान राज्यात नवीन सरकार स्थापित झाले की नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगाव-पुणे असा हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता.
पण, या मार्गात बदल करण्याचा घाट राज्य सरकारकडून घालण्यात आला. तसेच नव्याने नाशिक- सिन्नर- शिर्डी- पुणे असा हा मार्ग नेण्याची तयारी शासनाने केली.
पण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक-संगमेनर-पुणे असा मार्ग ठेवण्याचे आश्वासन दिले तसेच हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू असेही महायुतीने जाहीर केले आहे.
यामुळे नवीन सरकार स्थापित झाल्यानंतर या प्रकल्पाला गती द्यावी आणि या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी इच्छा आता या तिन्ही जिल्ह्यांमधील नागरिकांच्या माध्यमातून बोलून दाखवली जात आहे. हा 232 किलोमीटर लांबीचा दुहेरी रेल्वे मार्ग असून यासाठी 16000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणे ते नाशिक आणि नाशिक ते पुणे हा प्रवास फक्त पावणे दोन तासात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त होतोय. यामुळे अहिल्यानगर नाशिक पुणे या तिन्ही जिल्ह्यांमधील कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.