सत्ता स्थापनेनंतर फडणवीस सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांसंबंधित ‘हा’ निर्णय घ्यायला हवा ! आ. विक्रम पाचपुते यांची मागणी

शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झालेत यावर आपण काय सांगाल? असा प्रश्न विचारल्यानंतर पाचपुते यांनी असे म्हटले की, आमच्या सर्व युवकांच्या दृष्टिकोनातून ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे.

Tejas B Shelar
Published:
Vikram Pachpute News

Vikram Pachpute News : नुकताच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. यात भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांनी शपथ घेतली.

हा शपथविधीचा सोहळा फारच दिमाखात साजरा झाला असून या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समवेत अनेक राज्यांमधील मुख्यमंत्री उपस्थित होते.

दरम्यान, शपथविधी सोहळा संपन्न झाल्यानंतर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झालेत यावर आपण काय सांगाल? असा प्रश्न विचारल्यानंतर पाचपुते यांनी असे म्हटले की, आमच्या सर्व युवकांच्या दृष्टिकोनातून ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे.

कारण की आज खरेतर एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. तसं पाहिलं तर 2019 मध्येच महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली होती. मात्र दुर्दैवाने त्यावेळी सत्ता स्थापित करता आली नाही.

दरम्यान यावेळी पुन्हा एकदा जनतेने देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली आहे. महत्वाचे म्हणजे 2019 आणि 2024 च्या मँडेटमध्ये मोठा फरक आहे. यावेळी कोणीही ठरवलं असतं तरी देवेंद्र फडणवीसजी यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखता आलं नसतं.

कारण की, महाराष्ट्रातील जनतेने प्रचंड बहूमत देत आम्हाला संधी दिली आहे. यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे आणि येणारा काळ हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा ठरणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान यावेळी विक्रमसिंह पाचपुते यांनी आम्ही कृषीप्रधान भागातून येतो यामुळे सरकारने पहिला निर्णय शेतकरी कर्जमुक्तीचाच घेतला पाहिजे अशी आग्रही मागणी देखील उपस्थित केली आहे.

आम्ही आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि याच संदर्भात काहीतरी सकारात्मक निर्णय झाला पाहिजे अशी आशा यावेळी पाचपुते यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe