Ahilyanagar News : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं आज निधन झालं. त्यांनी आज वयाच्या 84 व्या वर्षी नाशिक येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलायं. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्यावर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून उपचार सुरू होते.
त्यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. यानंतर त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या नाईन पल्स या रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आजअखेर आदिवासी समाजासाठी झटणारा एक नेता कालवश झालाय.
मधुकर पिचड गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गंभीर आजारासोबत झुंज देत होते, पण आज त्यांची ही झुंज संपली असून त्यांची प्राणज्योत मावळली आहे. मधुकर पिचड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मोठे राजकीय प्रस्त होते.
पिचड यांच्या जाण्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे भाजपची मोठी राजकीय हानी झाली आहे. पिचड यांनी आदिवासी भागात मोठं काम केलं आहे.
आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावरच त्यांना आदिवासी विकास मंत्री बनवण्यात आले होते. त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघाचे 35 वर्ष प्रतिनिधित्व केले.
1980 ते 2004 या काळात ते अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत. म्हणजे तब्बल 7 वेळा त्यांनी या आदिवासी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. या काळात त्यांनी मतदारसंघाचा तर विकास केलाच सोबतच राज्यातील आदिवासी समाजासाठी महत्त्वपूर्ण असे योगदान देखील दिले.
ते मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. दरम्यान, त्यांनी 2019 मध्ये मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते भारतीय जनता पक्षात सक्रिय असून पक्षासाठी काम करत होते.
मध्यंतरी त्यांच्या पक्षांतराच्या बातम्या आल्या होत्या. ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यात. मात्र नंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक चा झटका आला आणि तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दरम्यान आज आदिवासी समाजाचा हा मोठा नेता आपल्यातुन निघून गेला असून त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी तयार झाली आहे.