Shirdi News : शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विक्रमी मताधिक्यांनी विधानसभेवर पाठवले आहे. विखे पाटील यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली. खरे तर शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला. ते १९९५ पासून सलग या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
ते सर्वप्रथम 1995 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत गेलेत आणि तेव्हापासून ते शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. 2024 च्या निवडणुकीत ते आठव्यांदा विजयी झाले असून त्यांनी नुकतीचं विधानसभा सदस्य पदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान, सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपस्थित सदस्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन सुद्धा केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांनीही समाज माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. यावेळी मावळत्या सरकारमधील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
त्यांनी असे म्हटले की, आजपर्यंत मिळालेल्या संधीतून विधानसभेमध्ये शिर्डी मतदारसंघासह जिल्ह्याचे प्रश्न उपस्थित करून सोडविता आले. मिळालेल्या निधीतून, मंत्रीपदाच्या माध्यमातूनही सामान्य माणसाला न्याय मिळवून देता आला.
शिर्डीसह अहिल्यानगरच्या विकासाचा आराखडा मागील अडीच वर्षात तयार करून, जिल्ह्याच्या विकास प्रक्रीयेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. यासाठी महायुती सरकारचे आपल्याला मोठे सहकार्य मिळाले.
औद्योगिक विकासाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे हाच आपला प्राधान्यक्रम असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
मतदारसंघातील विकास प्रक्रियेला पुढे घेऊन जातानाच दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी आता वाढली आहे, असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेने आजपर्यंत दाखविलेला विश्वास आणि सलग आठ वेळा विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याच्या दिलेल्या संधीमुळे माझा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे असे म्हटले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील 1995 पासून विधानसभेत आहेत, ते विधानसभेचे एक सीनियर सदस्य आहेत. मावळत्या सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे फडणवीस सरकार मध्येही त्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.
त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना नेमके कोणते खाते मिळणार? याचीचं उत्सुकता सध्या त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून या संदर्भात लवकरच निर्णय होईल असे म्हटले आहे.