India Longest Highway : मुंबई आणि नागपूर या दोन शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा एक्सप्रेस वे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षा मोठा महामार्ग आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे.
भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे. 1386 किलोमीटर लांबीचा मुंबई दिल्ली महामार्ग महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधून जाणार असून यामुळे मुंबई ते दिल्ली हा प्रवास वेगवान होणार आहे.
सध्या मुंबई ते दिल्ली हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 24 तासांचा म्हणजे संपूर्ण एक दिवस खर्च करावा लागतो. मात्र जेव्हा हा नवा महामार्ग रेडी होईल तेव्हा हा प्रवास कालावधी निम्म्याने कमी होणार आहे म्हणजेच मुंबई ते दिल्ली प्रवास अवघ्या बारा तासात पूर्ण करता येणे शक्य होईल.
या एक्सप्रेस वे च्या पहिल्या भागाचे उद्घाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. मात्र अजून हा संपूर्ण महामार्ग तयार झालेला नाही. यामुळे या महामार्गाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आणि केव्हापासून मुंबई ते दिल्ली हा प्रवास वेगवान होणार याबाबत जाणून घेण्याची नागरिकांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे.
कसा आहे भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग!
1386 किलोमीटर लांबीचा देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग जवळपास पंधरा हजार हेक्टर जमिनीवर तयार होणार आहे. हा एक्सप्रेस वे देशातील 45 महत्त्वाच्या शहरांना जोडणार आहे. हा महामार्ग आठ पदरी आहे मात्र भविष्यात बारा पदरी बनवता येणार आहे.
वन्य प्राण्यांसाठी या महामार्ग प्रकल्पा अंतर्गत ग्रीन ओवरपासची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा महामार्ग काही ठिकाणी जंगलातून जात असून याच ठिकाणी ही सुविधा राहणार आहे.
हा महामार्ग रेडी झाला की यावर 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावतील अशी माहिती तज्ञांनी दिली आहे. या महामार्गावर देशात पहिल्यांदाच 30 लेनचे टोलनाके विकसित होत आहेत.
म्हणजे टोल साठी वाहनांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही. अवघ्या 10 सेकंदात वाहनचालकांकडून टोल वसुली केली जाणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात झाडे लावली जाणार आहेत.
जवळपास 13 लाख झाडे लावण्याचे टार्गेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ठेवले आहे. या महामार्गालगत 12 हेलीपॅड तयार केली जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये याचा वापर होणार आहे. या प्रकल्पांतर्गत जे हेलिपॅड तयार होणार आहेत ते सर्व हेलिपॅड राजस्थान मध्ये राहतील.