Ahilyanagar Highway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी लोकसभेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी सावळी विहीर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग डांबरीऐवजी काँक्रिटचा होईल अशी मोठी घोषणा केली आहे.
गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे, या राष्ट्रीय महामार्गासाठी काढण्यात आलेले तिसरे टेंडर रद्द करण्यात आले असून हा रस्ता आता डांबर ऐवजी काँक्रीटचा होणार आहे. शिर्डीचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या संदर्भात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
खरे तर सध्या स्थितीला सावळीविहीर ते अहिल्यानगर यादरम्यानचा प्रवास फारच जीवघेणा झाला आहे. या मार्गावर आत्तापर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. या मार्गावर होत असणारे अपघात पाहता या महामार्गाचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे अशी भावना येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान याच महामार्गाच्या संदर्भात शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यालाच उत्तर देताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. हा रस्ता जवळपास 75 किलोमीटर लांबीचा असून लवकरच या रस्त्याचे काम आता सुरू होणार आहे.
यामुळे अहिल्यानगर ते सावळीविहीर हा प्रवास आगामी काळात जलद होणार आहे आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल आणि या भागात होणाऱ्या अपघातांवर देखील यामुळे नियंत्रण मिळवता येईल असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असे सांगितले की, सावळीविहीर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाचे कामाचे टेंडर यापूर्वी दोन ठेकेदारांनी नियोजित खर्चाच्या तीस ते चाळीस टक्के कमी दराने भरले.
काम अर्धवट टाकून ते पळून गेले. त्यांनी दिलेली बॅंक गॅरंटी देखील बनावट असल्याने निष्पन्न झाले. निकष शिथिल केल्याने हे घडले. आता निकष पूर्वीप्रमाणे ठेवले जातील. त्यामुळे असे प्रकार पुन्हा होणार नाहीत.
दरम्यान हा 75 किलोमीटर लांबीचा रस्ता कॉंक्रिटचा करण्याचा निर्णय नितीन गडकरी यांनी घेतला असल्याने या भागातील नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान या महत्वाच्या रस्ते प्रकल्पासाठी येत्या पंधरा दिवसांत निविदा जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या रस्त्याच्या कामासाठी जवळपास दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत रस्त्याची डागडुजी मात्र केली जाणार आहे.