राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हिवाळी अधिवेशनात घेण्यात आलेले 5 महत्त्वाचे निर्णय कोणते ? पहा…

हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता आपण हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी घेण्यात आलेले पाच महत्त्वाचे निर्णय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Tejas B Shelar
Published:

Hivali Adhiveshan 2024 : सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. 16 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून या हिवाळी अधिवेशनात सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. आज आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी घेण्यात आलेले पाच महत्त्वाचे निर्णय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. आता आपण हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी घेण्यात आलेले पाच महत्त्वाचे निर्णय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पहिला निर्णय : राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात हिवाळी अधिवेशनात मोठा निर्णय झालाय. राज्य शासनाने लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. आतापर्यंत लाडकी बहिण योजनेअंतर्गत एकूण 5 हप्ते देण्यात आले असून लवकरच सहावा हप्ता देखील मिळणार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपले की लगेचच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. याचसाठी हिवाळी अधिवेशनात कोट्यावधी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.

दुसरा निर्णय : महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या बळीराजा मोफत वीज सवलत योजनेसाठी देखील सरकारने कोट्यावधी रुपयांची तरतूद केलेली आहे. या योजनेसाठी तब्बल तीन हजार पन्नास कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील साडेसात अश्वशक्ती पर्यंत क्षमता असणाऱ्या कृषी पंप धारकांना मोफत वीज उपलब्ध करून दिली जात आहे. ही योजना जुलै 2024 पासून सुरू असून पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. दरम्यान याच योजनेसाठी आता 3 हजार 50 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे. यामुळे आगामी काळातही या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे.

तिसरा निर्णय : हिवाळी अधिवेशनात मोदी आवास योजने संदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी आवास योजना ही राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एक घरकुल योजना आहे. या योजनेतून राज्यातील ओबीसी प्रवर्गातील ज्या नागरिकांकडे स्वतःचे हक्काचे घर नाही अशा नागरिकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. घरकुलासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्याचे प्रावधान असून या योजनेसाठी 1250 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे.

चौथा निर्णय : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. हिवाळी अधिवेशनात या योजनेबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र गॅस नोंदणी महिलांच्या नावे असणे आवश्यक आहे. दरम्यान याच महत्वकांक्षी योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद हिवाळी अधिवेशनात करून देण्यात आली आहे.

पाचवा निर्णय : पाचवा निर्णय हा मुंबईकरांसाठी अधिक खास आहे. मुंबईकरांसाठी हिवाळी अधिवेशनात 1212 कोटी रुपयांची तरतूद करून देण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई मेट्रोसाठी 1212 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामुळे मुंबई मेट्रोच्या कामाला चालना मिळणार असून मुंबईमधील वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe