Radhakrishna Vikhe Patil News : फडणवीस मंत्रिमंडळात अहिल्यानगर जिल्ह्यातील फक्त एका व्यक्तीला स्थान मिळाले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपदाची (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) जबाबदारीं देण्यात आली आहे.
खरे तर, गेल्या शिंदे सरकार मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल मंत्री पदाची जबाबदारी होती. यामुळे जलसंपदा मंत्रीपद देऊन राधाकृष्ण विखे पाटील यांचे डिमोशन करण्यात आले आहे की, काय अशा चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे, काही राजकीय विश्लेषकांनी विखें यांनी स्वतःहून हे खाते आपल्याकडे खेचून घेत असावे असे म्हटले आहे. दरम्यान या साऱ्या चर्चा सुरु असतानाच आता जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात मोठे भाष्य केले आहे.
गोदावरी व कृष्णा खोऱ्याच्या जलसंपदा मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर मध्ये दाखल झालेत. यावेळी डॉ. विखे पाटील फाऊंडेशन येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे त्यांनी आशीर्वाद सुद्धा घेतलेत अन यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी सुद्धा संवाद साधला.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात आणण्याचे बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न होते.
या जबाबदारीच्या निमित्ताने मला हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मोठे समाधान आहे,” असे प्रतिपादन केले आहे. विखे म्हणालेत की, ”जलसंपदा विभागाची जबाबदारी देवून बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे दायित्व मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविले आहे.
कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला मसुदा सादर केला होता. त्याचेच आता धोरणात रुपांतर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करणाचे ध्येय ठेवले आहे.’’