पे अँड पार्किंग योजना म्हणजे मनपाचा सामान्य नगरकरांना लूटण्याचा डाव – किरण काळे;

Ahmednagarlive24 office
Updated:

अहिल्यानगर : मनपाने शहरातील मोक्याच्या ३५ रस्ते, जागांवर पे अँड पार्क योजना अंमलबजावणीची घोषणा केली आहे. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेसह उपनगरातील प्रमुख रहदारीचे रस्ते, जागा यांचा समावेश आहे.

त्याचबरोबर शहरातील मालमत्तां धारकांकडून सुधारित कर आकारणीचा देखील घाट घातला गेला आहे. प्रत्यक्षात नळाला दररोज स्वच्छ मुबलक पाणी येत नाही, रस्त्यांची दैनावस्था अजून संपलेली नाही, ७७८ रस्त्यांच्या कामांमध्ये बनावट टेस्ट रिपोर्टच्या आधारे सुमारे १५० कोटींहून अधिक रकमेचा स्कॅम झाला आहे,

कचरा संकलनाचा बोजवारा उडालेला असून शहरात ठिकठिकाणी कचरा आहे, कोट्यावधी रुपये खर्च करुन बसविण्यात आलेले पथदिवे अनेक ठिकाणी बंद पडलेले आहेत. नगरकरांना कोट्यावधींचा कर भरून देखील कोणतीही मूलभूत सुविधा मनपा देत नाही.

असे असताना देखील पे अँड पार्किंग योजनेची घोषणा आणि प्रस्तावित अंमलबजावणी म्हणजे मनपाचा सामान्य नगरकरांना लूटण्याचा डाव आहे. या निर्णयामुळे बाजारपेठ, व्यापारी उध्वस्त होतील.

मनपाने तात्काळ ही योजना मागे घेण्याची मागणी मनपा आयुक्त यशवंत डांगे, आ. संग्राम जगताप यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

मनपावर प्रशासकराज असले तरी देखील सत्तेचा रिमोट कंट्रोल शहरातल्या कोणत्या नेत्याच्या हातात आहे हे नगरकरांना माहिती असल्याचा देखील टोला काळे यांनी लगावला आहे.

महानगरपालिका प्रशासनाने पार्कीझ मोबेलिटी प्रा.लि. या खाजगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून रस्त्यांलगत, महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे अँड पार्कच्याल नियोजनाचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. त्याआधारे वसुली नियोजित केली जाणार आहे. याला किरण काळे यांनी आक्रमक होत कडाडून विरोध केला आहे.

“त्या” घटकांना रस्त्यावर आणू नका :

गाडगीळ पटांगणामध्ये पार्किंग प्रस्तावित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हातावर पोट भरणारे भाजी विक्रेते आपला प्रामाणिकपणे व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात.

त्यांना तिथून हटवून पार्किंगचा ठेका आपल्या मर्जीतील बगलबच्चांना दिला जात आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी अद्यावत असे भाजी मार्केट विकसित करायचे सोडून स्वयंरोजगार करणाऱ्यांना बेरोजगार करून देशोधडीला लावले जात आहे.

ऐतिहासिक नेहरू मार्केट बुलडोझर लावून अनेक वर्षांपूर्वी जमिनोदोस्त करण्यात आले. त्या जागी नवीन संकुल उभारणीचे आश्वासन देऊन धुळफेक केली गेली. प्रत्यक्षात आता त्या जागेवरील संकुलाचा प्रकल्प बासनात गुंडाळून पार्किंग साठी जागा लाटली जात आहे.

यामुळेच चितळे रोडवर गोरगरीब भाजी विक्रेते रस्त्यावर दुतर्फा बसून आपला उदरनिर्वाह करतात. एका बाजूला नेहरू मार्केट उभे राहू द्यायचे नाही, दुसऱ्या बाजूला अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरीब भाजी विक्रेत्यांना हूसकावून लावत उपासमारीच्या खाईत लोटायचे.

प्रोफेसर कॉलनी चौकात चौपाटी विकसित झाली आहे. या माध्यमातून अनेकांनी स्वयंरोजगार मिळविला आहे. नगरकर नागरिक देखील मोठ्या संख्येने या चौपाटीवर रोज सायंकाळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असतात.

मात्र हा परिसर देखील मनपाने नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येणार आहेत. खाद्य ग्राहकांची देखील गैरसोय होणार आहे.

मध्यवर्ती बाजारपेठेत पूर्वीसारखा व्यापार राहिलेला नाही. त्यातही आता बाजारपेठेतील अनेक ठिकाणी सशुल्क पार्किंगमुळे ग्राहक पाठ फिरवतील. यामुळे बाजारपेठ, व्यापारी उध्वस्त होतील. हा तुघलकी कारभार मनपा व सत्ताधाऱ्यांनी तात्काळ बंद करावा, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.

त्या टेंडर आडून नगरकरांना लुटण्याचा डाव :

खासगी संस्थेने तयार केलेल्या प्रकल्प अहवालाला महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढून शहरातील एका बड्या कार्यसम्राट नेत्याचा राजकीय वरदहस्त असणाऱ्या नाशिक येथील खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.

या संस्थेला पे अँड पार्क वसुलीसाठी पाच वर्षांकरिता रु. २१.७५ लाखांना टेंडर देण्यात आले आहे. म्हणजे वर्षाला रु. ४.३५ लाख, प्रत्येक महिन्याला रु. ३६ हजार २५० तर प्रत्येक दिवसाकाठी रु. १ हजार २०९ एवढी अल्प रक्कम सदर संस्था मनपाला देणार आहे.

दुचाकीसाठी एक तासा करिता मनपा या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांकडून ५ रुपये आकारणार आहे. म्हणजे संपूर्ण शहरात ३६ ठिकाणच्या पार्किंग मधून प्रत्येक दिवशी केवळ २४२ दुचाकींचीच वसुली यामध्ये गृहीत धरली आहे.

म्हणजे दर दिवशी सरासरी प्रत्येक ठिकाणी सहा ते सातच वाहनांच्या वसुलीतून एका दिवसाचे रु. १,२०९ संस्था वसूल करणार आहे. हा तर मनपाचा नगरकरांना खाजगी संस्थेच्या आडून लुटण्याचा डाव असल्याचा घाणाघाती आरोप किरण काळे यांनी केला आहे.

कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी नगरकर वेठीस :

मनपाने प्रस्तावित वसुली अत्यल्प रकमेची दाखवली असून धूळफेक करत नागरिकांकडून मात्र प्रत्यक्षात कोट्यावधी रुपयांची वसुली यातून केली जाणार आहे. सत्ताधारी हे आपल्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांना वेठीस धरत असल्याचा आरोप किरण काळे यांनी केला आहे.

कार्यकर्त्यांना अशा गैरमार्गाने रोजगार देण्यापेक्षा कार्यकर्त्यांसह नगर शहरातील तरुण पिढीला कायमस्वरूपी शाश्वत सदमार्गाने रोजगार देण्यासाठी सरकार दरबारी आपले वजन खर्च करावे, असा टोला किरण काळे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe