Shirdi News : पुढील महिन्यात श्रीक्षेत्र शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे महा अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. याच महा अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे नवोदित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी साईनगरी शिर्डीत दाखल झालेत. यावेळी त्यांनी साईबाबांची आरती केली अन दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.
महत्त्वाची बाब अशी की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाडीचे सारथ्य माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले. सुजय विखे पाटील हे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या गाडीचे कृष्ण बनलेत अन राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरु झालेत.
चंद्रशेखर बावनकुळे शिर्डीत आले, त्यांनी अन सुजय विखे पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. ड्रायव्हर सीटवर सुजय विखे पाटील आणि शेजारी बावनकुळे बसले होते. याचा व्हिडिओ देखील प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला अन याबाबत साहजिकच संपूर्ण राज्यभर चर्चा होणार होत्या आणि त्यानुसार या चर्चा सुरू झाल्यात.
दरम्यान यावेळी बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना बावळकुळे यांनी, साईबाबा सर्वांची इच्छा पूर्ण करतात. म्हणून मी सर्वांचे मंगलमय होऊ दे अशी प्रार्थना केली. मी मागील २९ वर्षांपासून २६ एप्रिलला येथे येत असतो.
मात्र मी शिर्डीत १२ जानेवारी २०२५ रोजी भारतीय जनता पक्षाचे शिर्डीत अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात राज्यातून १५ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या भाजपाच्या अधिवेशनाचा शुभारंभ राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते होणार आहे.
याचा समारोप सोहळा देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्तितीत पार पडणार आहे. या अधिवेशनात जनतेच्या विकासाचे लक्ष पूर्ण करण्यासाठी ठराव पारित करणार आहोत तसेच पक्ष म्हणून आम्ही आमचीही भूमिका मांडणार आहोत.
त्याचबरोबर विकासाचा झंजावात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अधिवेशनाला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय नेतृत्व, राज्याचे सर्व मंत्रीगण उपस्थित राहणार आहे.
पुढे बोलताना त्यांनी बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच अधिवेशनात या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडणार नाही असे म्हटले आहे. यामध्ये कोणी कितीही मोठा व्यक्ती दोषी असेल त्याला शिक्षा होईल. मुख्य सूत्रधाराला शिक्षा झाली पाहिजे या मताशी आम्ही देखील सहमत आहोत.
बीड, तुळजापूर मधील घटना गंभीर आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चौकशी सुरू केली आहे. त्या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल ते महाराष्ट्राला कळणारच आहे. बीड घटनेबाबत पोलीस तपासात कुठलाही अडथळा निर्माण होता कामा नये. या संदर्भात आ.सुरेश धस यांची मी भेट घेणार असे सुद्धा त्यांनी यावेळी म्हटले आहे.