१ जानेवारी २०२५ मुंबई: बुधवारपासून सुरू झालेल्या नवीन वर्षात अनेक क्षेत्रात बदल होणार असतानाच पायाभूत सुविधांच्या विकासाची गाडीसुद्धा या नव्या वर्षात सुसाट सुटणार आहे.यातील सर्वात मोठा व महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून उल्लेख होणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पालाही या वर्षात गती येणार असून प्रत्यक्ष जमिनी अधिग्रहणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यातच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सत्रू केलेली अनेक पुलांची, रस्त्यांची कामेही या वर्षात पूर्णत्वास जाणार आहेत. नवीन वर्ष मुंबईचा कायापालट करणारे ठरेल, असा विश्वास त्यामुळेच व्यक्त केला जात आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) जिल्ह्यातील उरण पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावे एका अधिसूचनेद्वारे नवीन शहर विकास क्षेत्राचा भाग म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत. या परिसरात तिसरी मुंबई वसणार असून एकूण ३२३.४४ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या केएससी न्यू टाऊनमध्ये औद्योगिक, वाहतूक केंद्रे, लॉजिस्टिक पार्क आणि निवासी वापरासाठी जागा उपलब्ध असेल.या प्रकल्पाचे हवाई सर्वेक्षण, बेस नकाशे आणि इतर प्राथमिक कामांना प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात अनेक नव्या प्रकल्पांचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याचे दिसून येत आहे. त्यात एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईची गती वाढणार आहे.
धारावी, रमाबाईनगरचा विकास
धारावी पुनर्विकासाचे काम सुरू असून या ठिकाणी सर्वेक्षणाच्या टप्प्यापर्यंत हा प्रकल्प पोहचला. धारावीच्या पुनर्विकासाचे काम पुढे सरकणार आहे. त्यासोबतच एमएमआरडीएकडून माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ४८ महिन्यांची मुदत ठरवण्यात आली असून पुढच्या १२ महिन्यांत या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू झालेले दिसू शकेल.
ऐरोली-काटई नाका
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारा हा दुवा आहे. या मार्गावरील ठाणे- बेलापूर या एलिव्हेटेड रस्त्याचे काम पूर्ण झाले, तर बोगद्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पामुळे ठाणे आणि बोरिवली दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. शिवडी-वरळी उन्नत रस्त्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे.
डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो
डी. एन. नगर ते मंडाले या २३.६ किमीच्या मेट्रो २ बचे काम ७८ टक्के पूर्ण झाले आहे. त्यातच मंडाले डेपोचे बांधकाम ९७ टक्के पूर्ण झाले असून नवीन वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो लाईन ४ आणि ४ अ वडाळा ते कासारवडवली आणि कासारवडवली ते गायमुख या प्रकल्पाचेही ७५ टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले आहे. तर मोघरपाडा डेपोसाठी भूसंपादनाचे काम सातत्याने सुरू आहे. मुंबई मेट्रो लाईन ५ ठाणे-भिवंडी-कल्याण, मेट्रो लाईन ६ स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी, मेट्रो लाईन्स ९ आणि ७ अ दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मार्गाची कामे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहेत.वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शून्य आयकॉनिक ब्रिजचे काम प्रगतीपथावर आहे, तर सांताक्रुझ-चेंबूर लिंकच्या विस्ताराचे अंदाजे ९५ टक्के स्ट्रक्चरल काम पूर्ण झाले आहे.