पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे दर वाढले ! एका लिटरसाठी मोजावे लागतात इतके पैसे…

Mahesh Waghmare
Published:

२ जानेवारी २०२५: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५६ पैसे आणि हायस्पीड डिझेलच्या दरात प्रतिलिटर २.९६ रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या पाकमधील जनतेला पेट्रोलसाठी प्रतिलिटर २५२.६६ रुपये आणि हाय-स्पीड डिझेलसाठी प्रतिलिटर २५८.३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

पाकिस्तान गत काही वर्षांपासून भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासोबत पाककडून वेळोवेळी इंधन दराच्या किमतीत देखील वाढ केली जात आहे.त्यानुसार पाकने ३१ डिसेंबरच्या रात्री उशिरा अधिसूचना जारी करत पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ केली.

नवीन दरवाढीनुसार पेट्रोलचे दर २५२.६६ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर २५८.३४ रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजार व स्थानिक आर्थिक स्थितीनुसार यात बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.नवीन किंमत बुधवारी दुपारी १२ वाजेपासून लागू करण्यात आल्या. पेट्रोलियम शुल्क कमी करण्यात सरकार असमर्थ ठरल्याने पाकच्या जनतेला ही दरवाढीची झळ सोसावी लागत आहे.

गत दीड महिन्यात इंधनाच्या दरात प्रतिलिटर १२.१४ रुपये वाढ झाली आहे. तर १६ ऑक्टोबरपासून हाय-स्पीड डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर १२.१४ रुपयांची वाढ झाली आहे.याच काळात पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर ५.०७ रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.

सरकारला दरवाढ रोखण्यासाठी पेट्रोलियम शुल्क कमी करता आले असते. पण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) नियमांनी पाकला असे करण्यापासून रोखले आहे. कारण आयएमएफने पाकला कर्ज देताना काही अटी व शर्थी लागू केलेल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe