२ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती आमदार हेमंत ओगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार ओगले यांनी शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांना स्पर्श करीत त्यामध्ये दूध दरवाढ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा, तसेच सोयाबीन व इतर पिकांच्या हमीभावात बाबत देखील सरकारचे लक्ष वेधले होते.
तसेच अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. त्याला यश आले असून शासनाने सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. जे शेतकरी ६ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची नोंद करतील, अशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत १२ जानेवारी पर्यंत केली जाणार आहे.
किमान आधारभूत किंमत योजना अंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी ४८९२ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सुरू आहे. त्यामुळे वाढलेल्या मुदतीची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीच्या ऑनलाइन नोंदी बाकी असतील,
अशा शेतकऱ्यांनी त्वरित ६ जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे.याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी आपल्याला अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.