फेसबुकवरील प्रेमात सीमोल्लंघन… यूपीचा तरुण पाकमध्ये जेरबंद !

Mahesh Waghmare
Published:

३ जानेवारी २०२५ अलीगड : सोशल माध्यमातून सीमेपलीकडच्या एका तरुणीवर प्रेम जडल्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्यासाठी सीमारेषा पार करणारा उत्तरप्रदेशातील एक तरुण चांगलाच अडचणीत सापडला आहे.अवैधरीत्या सीमारेषा ओलांडल्यामुळे पाकिस्तानी पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले आहे. याबाबत समजताच तरुणाच्या कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याप्रकरणात हस्तक्षेप करत आपल्या मुलाला सुखरूप परत आणण्याची याचना केली आहे.

प्रेमापायी सीमारेषा ओलांडणाऱ्या अलीगड जिल्ह्यातील या तरुणाचे नाव बादल बाबू असे आहे. पाकिस्तान प्राधिकरणने आपल्या देशात अवैधरीत्या प्रवेश केल्याप्रकरणी त्याला पंजाब प्रांतातून २८ डिसेंबर रोजी अटक केली होती.

प्रसारमाध्यमातून मुलाच्या अटकेचे वृत्त समजल्यानंतर तरुणाच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. कारण तरुणाने आपण कामासाठी दिल्लीत जात असल्याचे कुटुंबाला सांगत घर सोडले होते. २० ते २५ वयोगटातील बाबूची फेसबुकवरून पाकमधील २१ वर्षीय सना राणी नामक तरुणीसोबत मैत्री झाली होती.

यानंतर तिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याने कुटुंबाला आंधारात ठेवत थेट पाकिस्तान गाठले. पण अवैधरीत्या सीमारेषा ओलांडल्यामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात आले आहे.तर पाक तरुणीने बाबूसोबत आपण विवाह करण्यास इच्छुक नसल्याचा जबाब नोंदवला आहे.

पण गत अडीच वर्षांपासून फेसबुकवर आपण मित्र असल्याचे तिने मान्य केल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले.दोघांची भेट झाली की नाही ? याबाबत माहिती देण्यास पाक पोलिसांनी नकार दिला.दुसरीकडे अलीगडच्या खिटकारी गावात राहणाऱ्या बाबूच्या कुटुंबाने याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करत आपल्या मुलाला परत आणण्याची विनंती केली आहे.

सोबतच कुटुंबाने अलीगड पोलीस अधीक्षकांना (ग्रामीण) एक निवेदन देखील सोपवले आहे. बाबूची सुटका सुनिश्चित करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सीमापार प्रेमाचे यापूर्वीही किस्से !

सोशल माध्यमावरून प्रेम जडल्यानंतर कुठलाही विचार न करता सीमारेषा ओलांडण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी अंजू नामक एका भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठले होते.या ठिकाणी धर्मपरिवर्तन करत तिने पाक नागरिक नसरुल्लासोबत विवाह केला.

तर गतवर्षी पाकमधील सीमा हैदर नामक तरुणीने प्रियकराला भेटण्यासाठी अवैधरीत्या भारतात प्रवेश केला होता.चार मुलांसोबत नेपाळमार्गे भारतात आल्यानंतर तिने भारतीय व्यक्तीसोबत विवाह करत याच ठिकाणी संसार थाटला.

याच पद्धतीने गतवर्षी १९ वर्षीय इकरा जिवानी नामक पाक तरुणीची ऑनलाइन गेमच्या माध्यमातून २५ वर्षीय भारतीय नागरिक मुलायम सिंग यादव सोबत मैत्री झाली होती. यानंतर इकरा व मुलायम यांनी नेपाळमध्ये विवाह केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe