३ जानेवारी २०२५ कसबा बावडा : पांडूतात्या… उलपे मळ्यातील शेतात दिवसभर राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे… रात्री चार घास सुखाचे खाऊन येथील ज्ञानेश्वर मंदिरात भजनात दंग होणारे एक सर्वसामान्य वारकरी व्यक्तिमत्त्व. पंधरा दिवसांपूर्वी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक पांडूतात्यांना दरदरून घाम सुटला आणि पांडूतात्या दारात असलेल्या खाटेवर निपचित पडले.
अडाणी बायको अस्वस्थ झाली. तिने आरडाओरड सुरू केला. शेजारीपाजारी जमा झाले. त्यांनी पांडूतात्यांना तसेच उचलून गाडीतून कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात नेले.डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पांडूतात्या यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. पण गॅरंटी अजिबात देऊ शकत नव्हते.
पांडूतात्यांच्या घरी मिळवते कोणीच नाही. एकमेव विवाहित मुलगी… त्यामुळे हॉस्पिटलचा विनाकारण खर्च होण्यापेक्षा सरकारी दवाखान्यात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पांडूतात्यांची हालचाल सायंकाळी सात वाजल्यापासून जवळपास बंदच होती.
एव्हाना रात्रीचे दहा वाजून गेले होते. दवाखान्यात असणाऱ्या नातेवाईकांनी आशाच सोडली होती. पै-पाहुण्यांना फोन झाले. पांडूतात्यांना घरी आणत आहोत. तयारीने या, असे सगळ्यांना सांगितले. पांडूतात्यांच्या घरीसुद्धा अंत्यविधीच्या साहित्याची जमवाजमव सुरू झाली.
शववाहिनीलाही तयारीसाठी फोन झाला.पांडूतात्यांना रुग्णवाहिकेतून सगळं संपलं म्हणून घरी आणण्यात येत होतं. बायकोने घरी हंबरडा फोडला होता. शेजारीपाजारी जमा झाले होते. रुग्णवाहिका कसबा बावड्यात पोहोचली आणि पांडूतात्यांच्या हाताची हालचाल जाणवली.
रुग्णवाहिकेतील सोबत असणाऱ्यापैकी एकाने हालचाल टिपली आणि तो आश्चर्याने ओरडलाच, पांडूतात्या जिवंत हाईत. रुग्णवाहिकेने लगेच यू-टर्न घेत डी. वाय. पाटील हॉस्पिटल गाठले आणि येथेच पांडूतात्यांच्या जीवनाला यू टर्न मिळाला.
हॉस्पिटलमध्ये पांडूतात्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवसापासून पांडूतात्या हळूहळू उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. पांडूतात्यांवर हृदय शस्त्रक्रियेचे उपचार करण्यात आले.आज पांडूतात्या खणखणीत बरे झाले आहेत.
स्वतःचं मरण पाहून तात्या पुन्हा आपल्या घरी आला. पांडूतात्याचे नातेवाईक व शेजारीही आनंदित झाले. पासष्ठ वर्षाचा पांडूतात्या अर्थात पांडुरंग रामा उलपे हे आता बरे झालेत. पण त्यांना गरज आहे विश्रांतीची… शेजाऱ्यांनी, पै पाहुण्यांनी, बघायला येणाऱ्या जवळच्या लोकांनी आता पांडूतात्याच्या तब्येतीला पूर्ण सुधारण्यासाठी त्यांना आराम देण्याची गरज आहे.