Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन. ही गाडी 2019 मध्ये सुरू झाली, सध्या देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे. एकट्या महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील 11 मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
महाराष्ट्राला येत्या काही महिन्यांनी आणखी काही नवीन वंदे भारत ट्रेन मिळण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेसला भारतात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन 26 जानेवारीला रुळावर धावताना दिसणार आहे. भारतातील वंदे भारत स्लीपर ट्रेन या महिन्याच्या अखेरीस भरधाव वेगाने धावताना दिसणार आहे. पहिली ट्रेन दिल्ली ते कटरा (जम्मू-काश्मिर) दरम्यान चालवली जाईल अशी शक्यता मिळेल रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे.
या गाडीचा वेग ताशी १३० किलोमीटर असेल. वंदे भारत ट्रेनचा कमाल वेग हा 180 किलोमीटर प्रतितास एवढा आहे मात्र स्लीपर वंदे भारत ट्रेनचा वेग हा 130 किलोमीटर एवढाच असेल. प्रजासत्ताक दिनी अर्थातच 26 जानेवारी 2025 रोजी ही गाडी सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तथापि, याबाबतची कोणतीचं अधिकृत माहिती समोर आलेली नाही, म्हणून 26 जानेवारीला ही गाडी सुरू होणार का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. ही नवी गाडी पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आणि इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे ही गाडी तयार करण्यात आली आहे.
यामध्ये उत्तम वातानुकूलित सेवा, यूएसबी पोर्ट, पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र जागा आणि आधुनिक सुविधा असतील, या सुविधांसह ब्लॅक बॉक्स, उत्तम क्रॅश प्रोटेक्शन आणि अत्याधुनिक आगरोधक प्रणालीसह सुरक्षेला यात प्राधान्य देण्यात आले आहे.
स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या रचनेबाबत बोलायचं झालं तर यामध्ये एकूण १६ डब्बे आहेत. यात ८२३ प्रवासी बर्थ आहेत. १६ डब्यांमध्ये ११ डबे तृतीय श्रेणी वातानुकूलित, ४ डबे द्वीतीय श्रेणी वातानुकूलित आणि १ डबा प्रथम श्रेणी वातानुकूलित आहे.
महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर सारख्या शहरांना देखील वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये मुंबई ते दिल्ली आणि पुणे ते दिल्ली दरम्यानही वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.