आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी !

Mahesh Waghmare
Published:

३ जानेवारी २०२५ मुंबई : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी,अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरूवारी केली.

मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाबाबत आपली भूमिका मांडली. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून सीआयडीकडूनही तपास केला जात आहे.

हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात नेऊन त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी सगळ्यांची भूमिका आहे. या हत्येशी माझा काहीही संबंध नाही, त्यामुळे मी मंत्रीपदाचा राजीनामा का देऊ ? असा प्रश्नही मुंडे यांनी केला.

माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ‘मोठ्या ‘आका’ला वाचवण्यासाठी ‘लहान आका’चा एन्काऊंटरही होऊ शकतो’, या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. पण, ही ‘लहान आका’ आणि ‘मोठा आका’ अशी भाषा मी पहिल्यांदाच ऐकतोय.

बीडच्या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सीआयडी व्यवस्थित तपास करत आहेत.त्यामुळे, कोणी काय बोलावे आणि कोणाचे काय होणार, याला काहीही अर्थ नाही. मुळात बीड हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालले पाहिजे, ही मागणी मी सर्वात आधी केली होती, असे मुंडे म्हणाले.

बीड जिल्ह्याच्या पालक मंत्रीपदाबाबत बोलताना मुंडे म्हणाले, पालक मंत्रीपदाबाबत आम्हाला कळण्याआधी माध्यमांना कळते.आता मीच मंत्री असाताना, मीच पालकमंत्री का नसावे? हे विरोध करणाऱ्या लोकांना विचारलं तर अधिक योग्य होईल. माझ्या पालक मंत्रीपदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe