३ जानेवारी २०२५ नाशिक : नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातही दर्शनासाठी परराज्यातील भाविकांनी अलोट गर्दी केली असून जलद दर्शनाच्या नावाखाली त्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिला. नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी देश-विदेशांतून भाविक त्र्यंबकेश्वर या सिंहस्थ कुंभनगरीत दाखल होत असून मंदिरात अगदी पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागत आहेत.
या भाविकांना दर्शनासाठी तब्बल सहा ते सात तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मात्र, दुसरीकडे त्र्यंबकेश्वरच्या एका महाद्वाराबाहेर दर्शनाच्या नावाखाली पैशांची मागणी करत भाविकांची लूट सुरू असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे.
नाताळ आणि नवीन वर्षानिमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता १९ डिसेंबर २०२४ रोजी त्र्यंबकेश्वर संस्थानने पत्रक काढून ५ जानेवारी पर्यंत व्हीआयपी दर्शन बंद असल्याचे जाहीर केले होते.केवळ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी पूर्वनियोजित वेळेत दर्शन दिले जाईल,असाही या पत्रकात उल्लेख होता.मात्र, असे असतानाही व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली दर्शनासाठी ११०० ते २१०० रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार भाविकांनी केली आहे.
त्रंबकेश्वराची ख्याती देशभर असून येथे येणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी आर्थिक लूट करणे गैर आहे. हे टाळण्यासाठी मंदिराबाहेर नाशिक ग्रामीण पोलीस व मंदिराच्या आवारात ट्रस्टला सूचना देणार आहे.याशिवाय,गुप्त यंत्रणेमार्फत वेळोवेळी पाहणी करून दोषी आढळणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.- जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक