३ जानेवारी २०२५ हातगाव : शेवगाव तहसील कार्यालयात गुरुवारी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तब्बल अडीच तास उशिराने बैठक सुरू झाली. तरीही तालुक्यातील अनेक नागरिक बैठकीसाठी उपस्थित होते.
बैठकीत विविध गावचे सरपंच, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालक यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. प्रांताधिकारी प्रसाद मते, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश सेक्रेटरी अॅड. प्रतापराव ढाकणे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे, पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील रासने, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, एकनाथ कुसळकर यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी,नागरिक व महिला उपस्थित होत्या.
पिण्याचे पाणी,रहदारीचे रस्ते,अतिवृष्टीचे रेंगाळलेले अनुदान, घरकुल, महिला बालसंगोपन, ऑनलाईन रेशनकार्ड, मोफत धान्य वितरणातील अडचणी, प्राधान्य कार्ड वाटप, जमीन हस्तांतर, संजय गांधी स्वावलंबन व निराधार योजनेच्या प्रस्तावास मंजुरीबाबत संबंधित अधिकाऱ्यांची टाळाटाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा योजनेतील सावळ्या गोंधळाचा कारभार, जलजीवन, वीज वितरण, शेवगाव शहरातील पिण्याचे पाणी, रस्ते, दिवाबत्ती, आरोग्य, स्वच्छता, शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेच्या रेंगाळलेल्या कामासह शहरातील नागरिकांना किमान दिवसाआड पाणीपुरवठा करणे,आदी समस्यांचा उपस्थितांकडून पाढा वाचण्यात आला.
या वेळी तहसीलदार प्रशांत सांगडे प्रभारी गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी तालुक्यातील सद्य परिस्थितीचा आढावा मांडला. प्रांताधिकारी प्रसाद मते, सा. बां. विभागाचे पाठक, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, तालुका पुरवठा अधिकारी मंगल पवार, आगार व्यवस्थापक अमोल कोतकर, निवासी नायब तहसीलदार दीपक कारखिले, आदींसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह कॉ. संजय नांगरे, दत्तात्रय फुंदे, समद काझी, प्रकाश तुजारे, राहुल सावंत, डॉ. अमोल फडके, तुकाराम शिंदे, दत्ता आरे, सोमा मोहिते, अरुणा वाघ, आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
दरम्यान, साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामातील उसाचा भाव जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत लंके यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन माहिती घेतली. या याप्रश्नाकडे विभागीय साखर आयुक्तांचे लक्ष वेधून उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे अभिवचन दिले.
या वेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब फटांगडे, मच्छिद्र आरले, अशोक भोसले आदीसह पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या वेळी खा. लंके यांनी शेवगाव बसस्थानक परिसरात झालेल्या सिमेंट काँक्रिट कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
अधिकाऱ्यांनी नागरिकांसह शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात,ज्यांच्या समस्या सोडवल्या जाणार नाहीत,त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा,आपल्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल,नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा घेणारा मग तो कोणीही असो त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला आहे.