४ जानेवारी २०२५ बीजिंग : राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडून (एनसीडीसी) देशातील श्वसन आणि हंगामी इन्फ्लूएंझा रुग्णाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तसेच चीनमधील कथित एचएमपीव्ही आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर एनसीडीसी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संपर्कात आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी शुक्रवारी दिली.
परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण सुरू ठेवले जाणार आहे. आवश्यकतेनुसार माहिती व घडामोडींचे प्रमाणीकरण केले जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले. तर ह्युमन मेटान्यूमोव्हायरस हा इतर श्वसनजन्य विषाणूप्रमाणे आहे. कोरोनाप्रमाणे या आजारात खोकला, ताप, नाक बंद होणे आणि घशात खवखव होणे, अशी लक्षणे दिसून येतात, असे आरोग्य सेवेचे महासंचालक (डीजीएचएस) डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक झाल्याचे वृत्त आहे.
याचा सर्वात जास्त धोका बालकांना आणि वयोवृद्धांना आहे. परंतु, देशातील स्थितीवर आमचे लक्ष असून, घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गतवर्षीच्या तुलनेत यावेळी हिवाळ्यात श्वसनजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या कमी आहे. यात घाबरण्याचे कारण नाही. परदेशी नागरिकांसाठी चीनचा प्रवास करणे सुरक्षित असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.
संपूर्ण जगाला वेठीस पकडणाऱ्या कोरोना महामारीनंतर चीनमध्ये पुन्हा ह्युमन मेटान्यूमोव्हायरस आजाराचा (एचएमपीव्ही) वेगाने प्रादुर्भाव होत असल्याचे वृत्त धडकल्यानंतर भारताने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. देशातील इन्फ्लूएंझा रुग्णाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून, घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे सरकारने म्हटले आहे. दरम्यान, चीनने एचएमपीव्हीच्या उद्रेकाचे वृत्त फेटाळून लावत हिवाळ्यात सापडणारे श्वसनाचे रुग्ण गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी असल्याचा दावा केला आहे.