प्राजक्त तनपुरे यांचा ईव्हीएम पडताळणी अर्ज मागे

Mahesh Waghmare
Published:

४ जानेवारी २०२५ अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर ईव्हीएम मशीन संदर्भात शंका उपस्थित करीत त्याच्या पडताळणी करिता जिल्ह्यातील दहा उमेदवारांनी मतदान केंद्रांची सूची स्वतंत्ररीत्या सादर करीत तपासणीचे अर्ज निवडणूक शाखेकडे केले होते. यापैकी राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी सादर केलेला अर्ज लेखीपत्र देऊन मागे घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही जनमताचा कौल मिळेल, अशी अपेक्षा बाळगलेल्या महाविकास आघाडीचा सपशेल पराभव झाला. राज्य विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच आजपर्यंतचे उच्चांकी बहुमत घेत महायुतीची राज्यात पुन्हा सत्ता आली.

निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीच्या या विजयावर विरोधी असलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मतदान संयंत्र अर्थात ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करीत पडताळणीची मागणी राज्यात अनेक पराभूत उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाकडे संबंधित जिल्हा निवडणूक शाखेमार्फत केली.

अहिल्यानगर जिल्ह्यातही प्रताप ढाकणे (शेवगांव-पाथर्डी), प्रा. राम शिंदे (कर्जत-जामखेड), संदीप वर्षे (कोपरगांव), प्राजक्त तनपुरे (राहुरी), राणीताई लंके (पारनेर), शंकरराव गडाख (नेवासा), अभिषेक कळमकर (नगर शहर), प्रभावती घोगरे (शिर्डी), बाळासाहेब थोरात (संगमनेर) आणि राहुल जगताप (श्रीगोंदा) या १० उमेदवारांनी आपल्या मतदान केंद्रातील विशिष्ट मतदान केंद्रांची सूची जोडून संबंधित मतदान केंद्रातील मतदान संयंत्राची अर्थात ईव्हीएम पडताळणीची मागणी जिल्हा निवडणूक शाखेकडे केली.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीत पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या उमेदवाराला संबंधित मतदार संघातील एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के मतदान केंद्रांतील ईव्हीएम अर्थात मतदान यंत्राची तपासणी करण्याची मान्यता आहे.एका मतदान केंद्रातील ईव्हीएमच्या तपासणीसाठी ४७ हजार दोनशे रुपये फी संबंधित उमेदवाराने त्यासाठी आयोगाकडे मागणी अर्जासोबत जमा करणे बंधनकारक आहे.

या नियमानुसार जिल्ह्यातील दहा उमेदवारांनी आयोगाने निश्चित केलेल्या रकमेसह मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम मशीन फेर तपासणीची मागणी केली आहे. या ईव्हीएम मशीन फेर पडताळणीच्या संदर्भात आयोगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण देखील आयोजित केले आहे.

मतदान यंत्र ईव्हीएम फेर तपासणीची तारीख भारत निवडणूक आयोगाकडून निश्चित केली जाते.ही तारीख जाहीर झाल्यानंतर त्या तारखेच्या आधी तीन दिवसापर्यंत फेर पडताळणीची मागणी संबंधित उमेदवार पुन्हा मागे घेऊ शकतो. त्यानुसार राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तपासणीचा आपला अर्ज मागे घेतला आहे.

प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील मतदान यंत्राच्या तपासणीचा अर्ज लेखी स्वरूपात केला होता.प्रत्येकी ४७ हजार २०० याप्रमाणे दोन लाख ३६ हजार रुपये तनपुरे यांनी मागणी अर्जासोबत भरले होते.आता तनपुरे यांनी ईव्हीएम तपासणीचा आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडे तपासणीसाठी जमा केलेली रक्कम नियमानुसार विहित पद्धतीने तनपुरे यांना पुन्हा दिली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe