७ जानेवारी २०२५ मुंबई : पैसे दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका चिटफंड कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.या प्रकारानंतर सैरभैर झालेल्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे कार्यालय गाठले.चिटफंड कंपनीच्या या आमिषाला मुंबईतील जवळपास एक, दोन नाही, तर तब्बल तीन लाख लोक बळी पडल्याची चर्चा आहे.
संबंधित कंपनीकडे गुंतवणूकदारांचे ५०० कोटी रुपये असल्याची माहितीही दिली जात आहे. त्यामुळे कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी एकच गर्दी केली.गुंतवणूकदारांना मोठे आमिष दाखवत गुंतवणूक करा आणि व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा,असे आवाहन एका चिटफंड कंपनीने केले होते.
टोरेस लिमिटेड असे या कंपनीचे नाव होते.माफको मार्केटच्या समोर त्यांनी कार्यालय थाटले होते.त्यांनी गुंतवणूकदारांना पाच वर्षांत दुप्पट, सात वर्षांत तीनपट आणि १० वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचे आमिष दाखविले.शिवाय दर महिन्याला विशिष्ट व्याजही गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा होईल,असेही सांगण्यात आले.या आकर्षक योजनेची भूरळ पडलेल्या मुंबई व उपनगरांतील लाखो गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली.
पोलिसांत तक्रारी
मीरा-भाईंदर पोलिसांनी याबाबत गुंतवणूकदारांकडून तक्रारी स्वीकारण्यास सुरुवात केली.प्राथमिक चौकशीत कंपनीने मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, कंपनीच्या मालक आणि संचालकांची माहिती गोळा करण्यात येत आहे. या फसवणुकीमुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत. लोकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी, निवृत्तीचे पैसे आणि उधारीचे पैसे या कंपनीत गुंतवले होते.
दादरला मुख्य कार्यालय
या कंपनीचे मुख्य ऑफिस दादरला असून, गुंतवणूकदारांची गर्दी होऊ लागल्यानंतर या कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. दादर येथील मुख्य कार्यालय अचानक बंद झाले. शिवाय मीरा-भाईंदरमधील शोरूमदेखील बंद करण्यात आले.
ही दोन्ही कार्यालये बंद झाल्याची माहिती गुंतवणूकदारांना मिळाली.त्यांनी तातडीने या कार्यालयांकडे धाव घेतली.दोन्ही कार्यालयांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. त्यांचा आक्रोश होता. पण तो ऐकायला कोणी नव्हते.कार्यालयांना टाळे लागले होते.
मालक परदेशात
टोरेस कंपनीचा मालक गुंतवणूकदारांचे ५०० कोटी रुपये घेऊन परदेशात पळून गेल्याचा आरोप संतप्त गुंतवणूकदार करीत होते.अद्याप पोलिसांनी याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.मात्र, या कंपनीचा मालक सुर्वे नामक व्यक्ती होती,अशी माहिती गुंतवणूकदारांकडून मिळत आहे.कोट्यवधी रुपयांनी गंडवले गेलेल्यांनी आता पोलीस तक्रार करण्याचा मार्ग अवलंबला आहे.