देशात लवकरच धावणार पहिली बुलेट ट्रेन – नरेंद्र मोदी

Sushant Kulkarni
Published:

७ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : देशभरात हायस्पीड रेल्वेची वाढती मागणी आणि आपल्या सरकार अंतर्गत रेल्वे क्षेत्रात होत असलेल्या ऐतिहासिक बदलांमुळे ती वेळ दूर नाही जेव्हा देशात पहिली बुलेट ट्रेन धावेल,असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी व्यक्त केला.यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवीन जम्मू रेल्वे डिव्हीजन, तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन व ओडिशातील रायगडा रेल्वे डिव्हीजन इमारतीची पायाभरणी केली.

भारतीय रेल्वेचा विकास पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही चार निकषांवर पुढे जात आहोत.यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, रेल्वे प्रवाशांसाठी सुसज्ज व आधुनिक सुविधा, देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे तयार करणे आणि रोजगार निर्मिती करणे व उद्योगांना पाठबळ देण्यासारख्या बाबींचा समावेश असल्याचे मोदी म्हणाले.

जम्मू-काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशातील रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळेल व या भागातील सामाजिक-आर्थिक विकासात भर पडेल.नवीन प्रकल्पांमुळे देशाच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडच्या आधुनिक कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी भर पडल्याने संपूर्ण देशाने एक पाऊल पुढे टाकल्याचे आजच्या कार्यक्रमातून दिसून येते,असे मोदी म्हणाले.

‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास मदत करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तसेच भारतात १ हजार किमीहून अधिक मेट्रो रेल्वे जाळ्याचा विस्तार करत देश आपल्या उपक्रमांना गती देत असल्याचे ते म्हणाले.

रविवारी सुरू झालेल्या दिल्ली-मेट्रो प्रकल्पासहित अलीकडेच उ‌द्घाटन झालेल्या दिल्ली-एनसीआरमधील नमो भारत ट्रेनचा उल्लेख त्यांनी केला. ताशी १८० किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वे चाचणीचा उल्लेख करत मोदींनी ५० हून अधिक मार्गांवर १३६ हून अधिक वंदे भारत रेल्वे धावत असल्याचे म्हटले. तसेच ती वेळ दूर नाही ज्यावेळी पहिली बुलेट रेल्वे धावेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कमी वेळेत जास्त अंतर पूर्ण व्हावे अशी लोकांची इच्छा आहे.त्यामुळे हायस्पीड रेल्वेची मागणी वाढत आहे.त्यानुसार गत १० वर्षांत रेल्वेचे जाळे जाळे कमालीचे वाढल्याचे ते म्हणाले. २०१४ पर्यंत देशात फक्त ३५ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले होते.आज भारत रेल्वे मार्गांच्या १०० टक्के विद्युतीकरणाच्या अगदी जवळ असून गत १० वर्षांमध्ये ३० हजार किमीहून अधिक नवीन रेल्वे रूळ अंथरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe