७ जानेवारी २०२५ सुपा : हिवाळी अधिवेशनादरम्यानच डिसेंबर अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने हे पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागात महिलांनी सकाळ पासूनच बँकेसमोर गर्दी केली होती. काही महिलांनी केवायसीसाठी तर काहींनी पैसे जमा झाले की नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी बँकेत गर्दी केली.
यामुळे बँक कर्मचाऱ्यांची मात्र दमछाक होत आहे. गर्दीमध्ये या योजनेसोबतच दैनंदिन व्यवहार करणारे नागरिकही बँकेत येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडत आहे.निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जाहीर झालेली ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार की निवडणुकीनंतर बंद होणार,याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत; परंतु ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचा दावा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच केला आहे.
या योजनेचे भवितव्य काहीही असू द्या, मात्र आता मिळालेल्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लाडक्या बहिणी बँकेत गर्दी करीत आहेत. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.लाडकी बहीण योजनेला राज्यात महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला,पण योजनेसाठी कागदपत्रांची पूर्तता करताना महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे.
बँकिंग व प्रशासकीय यंत्रणेवर पण त्याचा ताण आला आहे.या योजनेचे २१०० रुपये कधीपासून खात्यात जमा होतील,असा प्रश्न या योजनेतील पात्र महिलांना पडला आहे.राज्यातील गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.
राज्य सरकारची लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला असून, एक हजार पाचशे रुपये काढण्यासाठी ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांसह पोस्ट ऑफिसमध्ये लाडक्या बहिणींची गर्दी होताना दिसत आहे.