वकील हत्याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर

Mahesh Waghmare
Published:

८ जानेवारी २०२५ देवळाली प्रवरा : राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्याच्या हत्येपूर्वीचे राहुरी येथील न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले.सीसीटीव्ही फुटेजधमील आरोपींची ओळख पटली असून साक्षीदार अॅड. रामदास बाचकर यांची उलट तपासणी होणार आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या समोर राहुरी येथील वकील दाम्पत्य राजाराम व मनीषा आढाव खून खटल्याची सोमवार पासून पुन्हा सुनावणी सुरू झाली.मागील सुनावणी दरम्यान माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे याची साक्ष नोंदविण्यात आली.

त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी अॅड. रामदास बाचकर यांची साक्ष नोंदविण्यात आली. अॅड. रामदास बाचकर २०२२ पासून वकिली करतात.तेव्हापासून ते वकील दाम्पत्य राजाराम आढाव व मनीषा आढाव यांना ओळखत होते.

वकील दाम्पत्याचा ज्या दिवशी खून झाला, त्या दिवशी ते सकाळी राहुरी न्यायालयात आले होते. त्यांना भेटण्यासाठी शुभम महाडिक व किरण दुशिंग हे आले होते. त्यानंतर वकील राजाराम आढाव न्यायालयातून बाहेर पडले.हा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

राहुरी न्यायालयाबाहेरील तसेच आतील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.वकील दाम्पत्याच्या खुनाची माहिती साक्षीदार अॅड. रामदास बाचकर यांनी पोलिसांना दिली होती.घटनेच्या दिवशीचा राहुरी न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज साक्षीदार बाचकर यांना दाखविण्यात आले.

त्यांनी आरोपींना ओळखले.तसेच अॅड. राजाराम आढाव यांची बॅग देखील ओळखली.सीसीटीव्ही फुटेज तपासणीत बराच वेळ गेला. दुपारनंतर साक्षीदाराची उलटतपासणी घेण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe