९ जानेवारी २०२५ कुकाणा : नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील सरपंच शैला कल्याण उभेदळ यांनी पाच लाख १७ हजार ६४९ रुपये ग्राम पंचायतमध्ये कागदोपत्री दाखवून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करीत यावर कारवाई न झाल्यास २६ जानेवारी २०२५ प्रजाकसत्ताक दिनी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा अमृत सुरेशराव उभेदळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.याबाबत पत्रकारांशी बोलताना ग्रामपंचायत सदस्य विकास उभेदळ व अमृत उभेदळ यांनी सुरेशनगर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दीड वर्षात झालेल्या अमाप आणि अडमाप भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला.
तसेच झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी शासन व उचस्तरावरील अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन केलेल्या सर्व तक्रारींची चौकशी केलेली असून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक तसेच शिपाई यांच्या मार्फत कागदोपत्री चालू असलेला भोंगळ कारभाराबद्दल दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य विकास पांडुरंग उभेदळ व बाबासाहेब उत्तम गायकवाड, अमृत उभेदळ यांच्यांसह ग्रामस्थांनी केली.अमृत उभेदळ यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात सुरेशनगर येथील सरपंच शैला कल्याण उभेदळ यांनी केलेल्या भ्रष्टाचारांचा पाढाच वाचून दाखविलेला असून या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची एकमुखी मागणी केली.
सार्वजनिक विहिरीचा गाळ काढणे व जाळी बसणे व पाईपलाईन दुरुस्ती कामी कुठलेही काम न करता १ लाख ७२ हजार ३०० रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच दीड वर्षात केलेली स्ट्रीट लाईट खरेदी, दुरुस्तीमध्ये एकूण ३ लाख ५ हजार ८४९ रुपयेचे खरेदी व दुरुस्ती बेकायदेशीर पणे दाखवून लाखोंचा रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे.
काहीही काम न करता बेकायदशीरपणे १८ हजार रुपये काढून भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला.तसेच वाचनालयाला रंग न देता बेकायदेशीरपणे २१ हजार ५०० रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उभेदळ यांनी सांगितले.याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेऊन उच्चस्तरीय अधिकारी नेमून या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी केलेली आहे.
त्यामुळे २० जानेवारी २०२५ पर्यंत दोषी सरपंच शैला कल्याण उभेदळ, ग्रामसेवक कैलास इंगळे, ग्रामपंचायत शिपाई अविनाश उभेदळ, नेवासा पंचायत समिती शाखा अभियंता सुशील माळवे यांच्यावर कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांच्या उपस्थितीत २६ जानेवारी २०२५ प्रजाकसत्ताक दिनी सकाळी १० वाजता प्रवरा संगम येथे गोदावरी तीरावर जलसमाधी घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, पोलिस अधिक्षक अहिल्यानगर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर, नेवासा तहसीलदार, नेवासा पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात उभेदळ यांनी म्हटले आहे.