९ जानेवारी २०२५ कासार पिंपळगाव : यंदा नोव्हेंबर पासून सीसीआयच्या वतीने प्रत्यक्ष कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे. चार पाच जिनिंगवर सीसीआय व खासगीरीत्या कापसाची खरेदी सुरू आहे.ज्यांना जमीनच नसलेले तसेच विविध ठिकाणी शेतकऱ्यांकडून कमी भावात खरेदी करणारे अनेक व्यापारी सीसीआयच्या केंद्रावर ओळखीच्या शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन त्यांच्या नावे कापूस घालताना दिसत आहेत.
शेतकऱ्यांचा माल रिजेक्ट तर व्यापाऱ्यांचा थेट काट्यावर दिसून येत असल्याची ओरड शेतकऱ्यांतून होत आहे. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसून शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.शेतामध्ये घेतलेल्या खरीप व रब्बी पिकाची नोंद सातबारावर ईपीकद्वारे करतात.
खरीप पिकाची नोंद जून-जुलैमध्ये होते.इतर पीक असलेल्या ठिकाणी कापूस असल्याची नोंद दाखवून बोगस सातबाराच्या आधारे केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांना मॅनेज करून कापूस घालण्यात येत आहे.तर खऱ्या शेतकऱ्याच्या नोंदी घेण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत.
शासकीय सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक हात आहे.शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर खासगी व्यापाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केला जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीकडे सीसीआय केंद्राचे चालक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.
मात्र या व्यापाऱ्यांच्या कापसाची खरेदी लवकर होत असल्याने शेतकऱ्यांची सीसीआय केंद्रावर होणारी अडवणूक थांबवावी अन्यथा शेतकरी क्रांती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, आ इशारा शेतकरी क्रांती संघटना पाथर्डी तालुकाध्यक्ष सचिन म्हस्के यांनी दिला आहे.
शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा बोगस सातबारा वापरून त्याआधारे कापूस जिनिंगवर घालण्यात येत असल्याचे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. सीसीआयद्वारे खरेदी करण्यात आलेल्या कापसाच्या सातबाराची पडताळणी करण्याची मागणी होत आहे.
सही-शिक्क्याची नक्कल व कापूस लागवडीचे प्रमाणपत्र घेऊनच शेतकऱ्यांना कापूस घालणे बंधनकारक करावे तसेच ज्या लोकांनी आतापर्यंत दोन महिन्यांत कापूस घातलेला आहे, त्यांची बिले देखील पीक पेरा पाहूनच द्यावीत, अनधिकृत व्यापाऱ्यांची कापूस खरेदी बंद करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.