Radhakrishna Vikhe Patil News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज दि. 9 जानेवारी 2025 रोजी पहिल्यांदा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्ली दरबारी जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या या भेटीमुळे मात्र नगरच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मंडळी, या भेटीदरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विमानतळाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार देखील मानलेत.
यावेळी शिर्डी विमानतळावरील नाईट लँडिंगचा महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला. खरेतर, सध्या शिर्डी विमानतळावर रात्रीच्या लँडिंगला परवानगी नाहीये, सुरक्षा दलाच्या कमतरतेमुळे नाईट लँडिंगला अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हीच अडचण केंद्रीय गृहमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ सीआयएसएफचे (CISF) अतिरिक्त सुरक्षा दल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आता येत्या काही दिवसांनी शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी मिळू शकते अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे याच महिन्यात शिर्डी विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांना परवानगी मिळेल, असे बोलले जात आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी विमानतळावर नाईट लाँडिंगला परवानगी मिळणार असल्याचे आश्वासन दिले असल्याने येत्या काही दिवसांनी याबाबतचा निर्णय होणार हे स्पष्ट होत आहे. नक्कीच या निर्णयामुळे शिर्डी आणि आसपासच्या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे तसेच विमान प्रवासासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार आहे.
पण, या भेटीत फक्त आभार व्यक्त करून शिर्डी विमानतळाच्या नाईट लँडिंग चा प्रश्न उपस्थित करण्यात आला की आणखी काही बातचीत झाली याचबाबत सध्या चर्चांना वेग आला आहे. विखे पिता-पुत्र यांचे दिल्ली दरबारी विशेष वजन आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत फारच मेहनत घेतली.
त्यांच्या रणनीतीमुळेच महायुतीला अहिल्यानगर जिल्ह्यात चांगले यश मिळाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 10 जागा महायुतीला जिंकता आल्यात आणि या विजया मागे विखे पाटील यांचा मोठा हातभार राहिला. खरे तर सुजय विखे पाटील हे संगमनेर मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.
पण ऐनवेळी ही जागा शिंदे गटाला सोडण्यात आली आणि येथून सुजय विखे पाटील यांचा पत्ता कट झाला. मात्र ते स्वतः निवडणुकीत उभे नसले तरीही त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात उभ्या उमेदवाराला रसद पुरवली आणि बलाढ्य बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला.
यामुळे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत या भेटीत बातचीत झाली असावी अशा सुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. म्हणून आता आगामी काळात नगरच्या राजकारणात काय होतं, सुजय विखे पाटील यांचे पक्षाकडून पुनर्वसन होणार का, हो तर त्यांना कोणती जबाबदारी दिली जाऊ शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.