जगाचे भविष्य ‘युद्ध’ नव्हे, तर ‘बुद्ध’ ! प्रवासी भारतीय दिवस संमेलन उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे प्रतिपादन

Sushant Kulkarni
Published:

१० जानेवारी २०२५ भुवनेश्वर : संपूर्ण जगाचे भविष्य हे युद्धात नव्हे, तर ‘बुद्धा’त सामावलेले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.तसेच भारत फक्त लोकशाहीची जननी नाही तर लोकशाही प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा भाग आहे,असे ते म्हणाले.ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये आयोजित ‘१८ व्या प्रवासी भारतीय दिवस-२०२५’ संमेलनाच्या उद्घाटना प्रसंगी मोदी बोलत होते.

संमेलनाला संबोधित करताना मोदींनी जागतिक स्तरावर वाढत असलेल्या भारताच्या दबदब्याबरोबर प्रवासी भारतीयांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. २१ व्या शतकातील भारत आजघडीला ज्या वेगाने पुढे जात आहे,ज्या स्तरावर विकास कामे होत आहेत ते अभूतपूर्व आहे. भारत सांगत असलेली गोष्ट आजघडीला संपूर्ण जग लक्षपूर्वक ऐकत आहे.

आज भारत आपली बाजू ताकदीने मांडत आहे.ग्लोबल साऊथची बाजू मांडण्यात देखील भारत मागे पडत नसल्याचे मोदी म्हणाले.मानवता प्रथम भावनेसोबत भारत आपल्या जागतिक भूमिकेचा विस्तार करत आहे.संपूर्ण जग ज्यावेळी तलवारीच्या जोरावर साम्राज्य वाढवत होते,त्यावेळी आपल्या सम्राट अशोकांनी याच ओडिशात शांततेचा मार्ग स्वीकारला होता.

या समृद्ध वारशामुळेच आज भारत जगाला आपले भविष्य हे युद्धात नव्हे तर बुद्धात वसलेले असल्याचे ठासून सांगत असल्याचे मोदी म्हणाले.तसेच भारतात आयोजित यशस्वी जी-२० संमेलनाचा उल्लेख त्यांनी केला. जगाला देशातील विविधता दाखवण्यासाठी संमेलनाचे आयोजन देशाच्या विविध भागांत करण्यात आले होते. आपला देश फक्त लोकशाहीची जननी नाही तर लोकशाही ही लोकांच्या जीवनाचा भाग आहे.

आपल्याला विविधता शिकावी लागत नाही.आपले जीवनच विविधतेवर चालत आहे.भारत आता जागतिक स्तरावर ‘विश्व बंधू’ म्हणून ओळखला जात असून हे आणखी मजबूत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.भारत स्वदेशी लढाऊ विमान, मालवाहू विमान बनवत आहे. तो दिवस दूर नाही ज्यावेळी विदेशातील भारतीय स्वदेशी विमानाने प्रवासी दिवस साजरा करण्यासाठी देशात येतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe