Shetkari KarjMafi : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल. विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्यात आणि या घोषणांवर सर्वसामान्यांनी विश्वास दाखवला. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुतीने महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केली.
अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अशा असंख्य योजना सुरू करण्यात आल्यात. याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता अन शेतकरी कर्जमाफी यांसारख्या काही मोठ्या घोषणांचा समावेश करण्यात आला.
दरम्यान आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापित होऊन बरेच दिवस पूर्ण झाले असल्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी संदर्भात विचारणा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही जाहीरनाम्यात जे आश्वासन दिले आहे ते सारे पूर्ण करू असे म्हटले आहे.
म्हणजेच त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असे संकेत दिले आहेत. पण, राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले आहे. “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?” असं विधान अजित पवार यांनी केलं आहे.
त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या विधानामुळे कर्जमाफीच्या बाबतीत संभ्रमअवस्था तर तयार झालीच आहे शिवाय शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात नाराजी वाढू लागली आहे.
दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात आपल्या एका कार्यकर्त्याला उद्देशून बोलताना अजित पवार म्हणालेत की, “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?.. मी जेवढी भाषणं केली…तुला एक माहिती आहे का? आंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात… राज्याचा गाडा आपल्याकडे आहे.
आपण दोघं नंतर बसू… तुला मी माझी परिस्थिती सांगतो…मग तू मला तुझा सल्ला दे. मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण करू. आपण करायला कमी पडणार नाही”. या विधानामुळे महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार की नाही हा सवाल उपस्थित होतोय.