आता पुढील महाविजयासाठी लढा ! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला

Published on -

१३ जानेवारी २०२५ शिर्डी: लोकसभेला ४८ पैकी १७ जागा मिळून आपण काठावर पास झालो होतो; परंतु मनात मात्र नापास झाल्याची भावना होती. हे अपयश पुसण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काम केले, म्हणून महायुती राज्यात विक्रमी २३७ जागा मिळवू शकली.

यात महायुतीला ८२ टक्के मते तर भाजपला ८९ टक्के मते मिळाली.हा महाविजय जनता जनार्दनाबरोबर कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे साकारला आहे.आता असाच महाविजय येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवण्यासाठी लढा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

भाजपच्या प्रदेश अधिवेशनात कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राच्या महानिकालाने ३० वर्षांचा इतिहास मोडित काढला आहे. तिसऱ्यांदा भाजपचे १०० पेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत.

भाजपने सहा राज्यांत सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे.आपण मोठ्या मताधिक्याने जिंकलो, विजयासाठी झटल्याने दमलो,अशी भावना जर कार्यकर्त्यांची झाली, तर हा विजय आपल्याला पचणार नाही.मिळालेला विजय आपल्याला सुखाने राज्यकारभार करण्यासाठी मिळालेला नाही, तर जनतेला सुखी करणारा राज्यकारभार करण्यासाठी मिळाला आहे, याची जाणीव कार्यकर्ते ते नेते अशी प्रत्येकाने ठेवायला हवी.

चालू वर्ष संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष शेलार, माजी मंत्री भारती पवार, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, भाजप नेते रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि अशोक चव्हाण आदींची भाषणे झाली.

जनतेचे प्रश्न घेऊन मंत्रालयात या !

मंत्रालयात येणे चुकीचे नाही; परंतु सिम्बॉल ऑफ ऑफ स्टेटस म्हणून मंत्रालयात येऊ नका, त्याऐवजी जनतेचे प्रश्न घेऊन मंत्रालयात या. विकासाची कामे करून घ्या, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

योजना बंद नव्हे, प्रभावीपणे राबवणार

आम्ही सत्तेत आल्यावर विरोधक लाडकी बहीण, युवा तरुण, शेतकरी, दिव्यांग यांच्यासाठी सुरू केलेल्या योजना बंद करणार असल्याचे नरेटिव्ह पसरत आहेत; परंतु आम्ही यातील कुठलीही योजना बंद करणार नाही, उलट जनतेच्या भल्यासाठी त्या आणखी प्रभावीपणे राबवणार आहोत, त्यामुळे कार्यकर्ते व जनतेने फेक नरेटिव्हला बळी पडू नये, असे फडणवीस म्हणाले.

संविधानाबद्दल अपप्रचार करणाऱ्याना जागा दाखवा

व्होट जिहाद, फेक नरेटिव्ह, बांगलादेशी घुसखोर ही आव्हाने आपल्यासमोर असली, तरी जसे सत्ता मिळवण्यासाठी आपण एकत्र आलो, तसे आता महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी व प्रगतीपथावर नेण्यासाठी एक राहाणे गरजेचे आहे. या विरोधातील लढाई घट्ट करू या. महाराष्ट्राच्या विकासासाठी नद्याजोड प्रकल्प हाती घेतला आहे.

समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणले जाणार आहे. त्यामुळे हे सरकार जनतेचे सरकार आहे, ही भावना जनसामान्यांत रुजण्यासाठी शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा. हे अधिवेशन साईच्या भूमीत होत आहे.

साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या पक्षासाठीदेखील महत्त्वाचा आहे. ज्यांना तो समजला, ते यशस्वी झाले. ज्यांना तो समजला नाही, त्यांची हालत काय आहे, हे आपण पाहातोच आहोत.

हे जनतेचे सरकार आहे, हे जनतेला वाटण्यासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा प्रशासनाला दिला आहे. ‘जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे आपले सरकार आहे’, अशी सरकारची प्रतिमा, तर ‘सरकारमागे भक्कम पक्ष संघटनेचे बळ, ‘ अशी पक्षाची प्रतिमा, या दोन्ही निर्माण करण्यासाठी आपण काम करूया.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe