१३ जानेवारी २०२५ पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणात राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापलेले पाहावयास मिळाले.
पुण्यातील स्वस्तिक पॉलिक्लिनिक अॅण्ड डायग्नोस्टिक सेंटरचा उद्घाटन समारंभ रविवारी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे झाला.याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नायगाव येथील कामाची पाहणी केली.
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना संताप व्यक्त करून ते निघून गेले.यावेळी माध्यम प्रतिनिधीला त्यांनी ‘तुझे नाव नसेल,तर राजीनामा घेता येईल का ?’ असा प्रतिसवाल केला.दरम्यान,संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.याबाबत अजित पवार या पुढच्या काळात काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.