पंतप्रधान उद्या मुंबई दौऱ्यावर ; मोदींच्या हस्ते होणार तीन युद्धनौका, एका पाणबुडीचा नौदलात समावेश

Mahesh Waghmare
Published:

१४ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : नौदलात १५ जानेवारीला दोन स्वदेशी युद्धनौका आणि एक डिझेल-विद्युत पाणबुडी यांचा समावेश करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यात मुंबईतील नौदलाच्या गोदीत या तीन युद्धनौका देशाला समर्पित करतील.स्वदेशी संरक्षण साहित्य निर्मिती आणि सागरी सुरक्षेच्या बाबतीत आघाडी घेण्याच्या भारताच्या वाटचालीतील हा मैलाचा दगड असेल.

आयएनएस सुरत ही गाइडेड-मिसाईल विनाशिका आहे.१५बी श्रेणीतील ही चौथी व शेवटची युद्धनौका आहे.या श्रेणीतील युद्धनौका जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहेत.या जहाजाच्या बांधणीतील ७५ टक्के साहित्य स्वदेशी आहे.

आयएनएस सुरतसोबतच आयएनएस निलगिरी ही रडारला चकवा देणारी युद्धनौका देखील बुधवारी देशसेवेत दाखल होईल. १७ए स्टील्थ फ्रिगेट प्रकल्पातील ही पहिली युद्धनौका आहे.या प्रोजेक्ट अंतर्गत एकूण सात युद्धनौका तयार करण्यात येणार आहेत.

या दोन्ही युद्धनौकांवर चेतक, अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर (एएलएच), सी किंग, एमएच- ६० आर यांसारखे हेलिकॉप्टर उतरू शकतात.या दोन स्वदेशी युद्ध नौकांसह आयएनएस वाघशीर या डिझेल-विद्युत पाणबुडीचा नौदलात समावेश होणार आहे.वाघशीर कलावरी-क्लास प्रोजेक्ट ७५ अंतर्गत तयार करण्यात आलेली सहावी पाणबुडी आहे.

फ्रान्सच्या मदतीने या पाणबुडीची बांधणी करण्यात आली आहे. पाण्यावरील आणि पाण्याखालील युद्ध, शत्रूच्या प्रदेशात जाऊन गोपनीय माहिती मिळवणे, टेहाळणी आणि विशेष मोहिमा पार पाडण्यास ही पाणबुडी सक्षम आहे.या पाणबुडीवर पाणतीर, जहाजरोधी क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक सोलार यंत्रणा आहे.

महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यात मोदी नवी मुंबईच्या खारघर येथे इस्कॉन समूहाने बांधलेले श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे देखील उद्घाटन करतील.वैदिक शिक्षणाच्या माध्यमातून सार्वभौमिक बंधुत्व, शांतता आणि स‌द्भावनेला चालना देण्याच्या उद्देशाने हे मंदिर बांधण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe