HDFC Flexi Cap Fund:- मुदत ठेव योजना आणि पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या छोट्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांपासून बघितले तर म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला वाढताना दिसून येत आहे. यामध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते आणि एकरकमी गुंतवणूक देखील यामध्ये करता येणे शक्य आहे.
म्युच्युअल फंडांमधील जी काही गुंतवणूक असते ती जरा जोखमीची असते. परंतु परतावा चांगला मिळत असल्यामुळे गुंतवणूकदारांचा ओघ म्युच्युअल फंडांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहे.अगदी त्याचप्रमाणे एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या फ्लॅक्सी कॅप योजनेच्या बाबतीत बघितले तरी ही योजना गुंतवणूकदारांसाठी खूप फायद्याची ठरली असून
नुकतेच 1 जानेवारी 2025 रोजी या योजनेला सुरू होऊन तीस वर्षे पूर्ण झाली. तीस वर्षानंतर गुंतवणूकदारांच्या बाबतीत बघितले तर त्यांच्यासाठी वेल्थ क्रिएशन म्हणजे संपत्ती निर्माण करण्याच्या बाबतीत या योजनेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
महिन्याला 2 हजार रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांना मिळाले चार कोटी रुपये
एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या फ्लेक्सी कॅप योजनेचे वैशिष्ट्य बघितले तर जेव्हा या योजनेची सुरुवात झाली तेव्हापासून ज्या गुंतवणूकदाराने प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपयांची एसआयपी केली असेल तर त्यांच्याकडे आज चार कोटी रुपयांचा फंड जमा झाला असेल.
तसेच एसआयपी शिवाय या योजनेमध्ये ज्यांनी एकरकमी गुंतवणूक केली असेल अशा गुंतवणूकदारांना तब्बल 181 पट परतावा मिळाला आहे.जर आपण म्युच्युअल फंड उद्योगातील एयुएमच्या बाबतीत इतर म्युच्युअल फंडाच्या योजना बघितल्या तर त्यामध्ये एचडीएफसीची ही योजना किंवा हा फंड पहिल्या तीनमध्ये समाविष्ट आहे.
सध्या या योजनेमध्ये 66 हजार 344 कोटींची व्यवस्थापनाखालील मालमत्ता असून या फंडाचे रेगुलर प्लॅनचे खर्च गुणोत्तर 1.42% आहे. आकाराने मोठा असलेला हा फंड परतावा देण्याच्या दृष्टिकोनातून देखील सरस ठरला आहे.
एचडीएफसी म्युच्युअल फंड फ्लेक्सी कॅप फंडाने एसआयपीवर किती दिला परतावा?
जसे आपण बघितले की,हा फंड एक जानेवारी 1995 ला स्थापन करण्यात आला होता व नुकतेच या योजनेला तीस वर्षे पूर्ण झाले व या फंडाचा तीस वर्षाचा उपलब्ध असलेला एसआयपी डेटा व्हॅल्यू रिसर्च बघितला तर त्यानुसार एसआयपीचा तीस वर्षाचा वार्षिक परतावा हा 21.6% इतका राहिला.
जर दोन हजार रुपये मासिक एसआयपी यामध्ये केली असती तर तीस वर्षातील एकूण गुंतवणूक सात लाख वीस हजार रुपये जमा झाली असती व 29 वर्षातील या एसआयपीचे एकूण मूल्य 39,797,406 रुपये झाले असते.
या फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर किती परतावा दिला?
एचडीएफसीच्या या फंडाची लॉन्चिंग झाल्यापासून आतापर्यंतचा परतावा वार्षिक 18.92% इतका मिळाला व जर एकरकमी एक लाखाची गुंतवणूक यामध्ये केली असती तर त्या गुंतवणुकीचे मूल्य आता एक कोटी 80 लाख 98 हजार 684.77 रुपये इतके झाले असते.
वर्षानुसार या फंडाने दिलेला परतावा
या फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीचा जर वर्षनिहाय परतावा बघितला तर यामध्ये एक वर्षाचा परतावा हा 19.95%, तीन वर्षाचा परतावा 21.42% वार्षिक, पाच वर्षाचा परतावा 21.90% वार्षिक, सात वर्षाचा परतावा 15.56% वार्षिक आणि दहा वर्षाचा परतावा जवळपास 14.52% वार्षिक इतका मिळाला.