१६ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : फेसबुकचे संस्थापक व मेटा कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी भारतातील निवडणुकी संदर्भात केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांच्या कंपनीने जाहीर माफी मागितली आहे.मार्क झुकरबर्ग यांच्याकडून बोलताना अनवधानाने ही चूक झाल्याचे मेटा इंडियाने बुधवारी म्हटले. कोरोना महामारीनंतर २०२४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह विविध देशांतील विद्यमान सरकार पडल्याचा दावा झुकरबर्ग यांनी केला होता.
मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी सोशल माध्यम ‘एक्स’वर मार्क झुकरबर्ग यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.केंद्रीय माहिती व प्रसारण आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत ठुकराल यांनी झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
झुकरबर्ग यांचे २०२४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक सत्ताधारी पक्ष पराभूत झाल्याचे वक्तव्य काही देशांसाठी योग्य आहे.पण भारताच्या संदर्भात हे चुकीचे आहे.त्यांच्याकडून अनवधानाने झालेल्या चुकीसाठी आम्ही माफी मागत आहोत.
भारत हा मेटा कंपनीसाठी महत्त्वाचा देश आहे.देशाच्या अभिनव भविष्याच्या केंद्रस्थानी आम्ही राहू,अशी आम्हाला आशा आहे,असे ठुकराल यांनी म्हटले.वैष्णव आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी झुकरबर्ग यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला होता.
संसदेच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष असलेल्या दुबे यांनी या प्रकरणात मार्क झुकरबर्गला नोटीस बजावण्याचा इशारा दिला होता.यानंतर कंपनीने माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.